लोकसत्ता टीम
नागपूर: नागपूर वाईन क्लब आणि नागपूर ॲग्रो डेव्हलपमेंट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने उपराजधानीतील श्री भगवती पार्क, त्रिमुर्ती नगर, रिंग रोड येथे २ आणि ३ डिसेंबरला ‘वाईन ॲन्ड फुड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गुरूवारी लक्ष्मीनगरच्या एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत नागपूर वाईन क्लबचे दीपक खानुजा यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन २ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता होईल. उद्घाटनानंतर महोत्सव रात्री १०.३० वाजतापर्यंत तर ३ डिसेंबरला दुपारी १२.३० ते रात्री १०.३० पर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहिल. महोत्सवासाठी क्लबकडून माफक शुल्क निश्चित केले गेले आहे. महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील १२ वाईनरी सहभागी होतील. याप्रसंगी नाशिक, पूणे, सांगली परिसरातील द्राक्षांपासून निर्मित वाईन उपलब्ध राहिल.
आणखी वाचा-राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी…
महोत्सवात ७ अन्नाचेही स्टॉल राहतील. त्यात परिपूर्ण खाद्यपदार्थ म्हणून विदेशी पाककृतींचा समावेश राहिल. या महोत्सवात राज्याच्या वेगवेगळ्या भागासह मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातूनही २,५०० ते ३ हजार वाईन प्रेमी भेट देण्याची शक्यताही, खानुजा यांनी वर्तवली. पत्रकार परिषदेला क्सबचे संचालक शरद फडणीस, सुधीर कुंटे आणि इतरही संचालक उपस्थित होते. महोत्सवात भेट देणाऱ्यांच्या मनोरंजनासाठी म्युझिकल बँड, स्त्रिया आणि मुलींसाठी ग्रेप स्टॉम्पिंग इव्हेंट राहिल.
या वायनरीजची उपस्थिती
महोत्सवात सुला, गोवर- झंपा, फ्रुझांते, फ्रेटली, रेस्वेरा वाईनरी, व्हर्जिन हिल्स, गुड ड्रॉप वाईन सेलार्स, यॉर्क वाईनरी, विनेलँड वाईनरी, मूनशिन वाईनरी, सफाल्या अल्कोबेव्हडेज या वायनरीजची उपस्थिती राहणार आहे.
महोत्सवाचा इतिहास..
नागपूर वाईन क्लबकडून उपराजधानीत वाईन महोत्सवाची सुरवात २०१३ पासून करण्यात आली. यावर्षी महोत्सवात नाशिकच्या ८ वायनरी सहभागी झाल्या होत्या. गेल्यावर्षी २०२२ मध्ये महोत्सवात १० वायनरी सहभागी झाल्या होत्या. तर यंदा सर्वाधिक १२ वायनरी सहभागी होणार आहे.
आणखी वाचा-६० कोटी खर्चून तयार होणार जिल्हा न्यायालयाची नवीन विस्तारीत इमारत; विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण
परराज्यातील वाईनला मागणी कमी
राज्यात महाराष्ट्रात निर्मित वाईनवर कमी कर असल्याने त्याचे दर कमी आहे. त्यामुळे येथे सर्वाधिक राज्यातील निर्मित वाईनला नागरिकांकडून मागणी आहे. कर्णाटक, मेघालय, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशातील वाईनवर राज्यात जास्त कर लावण्यात आला आहे. त्यामुळे तेथील वाईनची मागणी कमी आहे. राज्यात सर्वाधिक वाईन द्राक्षावर आधारीत तयार होते. तर मेघालयात किवीपासून निर्मित, हिमाचल प्रदेशात सफरचंद आणि इतरही तेथे निर्मीत फळांपासून वाईन तयार केली जात असल्याचेही पत्रपरिषदेत सांगण्यात आले.