नागपूर : सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्यानंतर पैसे परत मिळण्याची आशा अनेक तक्रारदार सोडून देतात. मात्र, नागपूर पोलिसांनी प्रलोभनाच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांची लुबाळणाऱ्या सायबर गुन्हेगारांना झटका दिला. त्यांच्या विविध बँक खात्यातील २४ लाखांची रक्कम गोठवून न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीला ७ लाख ७५ हजार रुपये परत केले. सायबर पोलिसांच्या प्रयत्नामुळे पीडितांना दिलासा मिळत आहे.
वैभवनगर, दिघोरी येथील रहिवासी फिर्यादी भावेश उके एका खाजगी शोरूमध्ये काम करतात. एका सायबर गुन्हेगाराने त्यांना घरबसल्या काम करण्याची ऑफर दिली. त्याने दाखविलेल्या विविध आमिषला ते बळी पडले. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केल्यास भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरूवातीला भावेश यांना चांगला परतावा दिला. त्यामुळे त्यांनी गुंतवणुकीची रक्कम वाढविली. परतावा केवळ ऑनलाईन दिसत होता. रक्कम काढण्यासाठी पुन्हा रक्कम गुंतवणूक करण्यास बाध्य करायचा. असे करता करता गुंतवणुकीची रक्कम ८ लाख ७७ हजार रुपये एवढी झाली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
हेही वाचा >>>जालना मराठा आंदोलक लाठीमार प्रकरण, चौकशीअंती जिल्हा पोलीस अधीक्षकांवर मोठी कारवाई
पोलिसांनी संबधीत बँकांना तात्काळ ई मेल केले तसेच विविध बँकांमध्ये जावून पाठपुरावा केला. संबधीत बँकाचे नोडल अधिकारी यांच्याशी बोलून आरोपीच्या विविध बँक खात्यातील २४ लाख ७९ हजार रुपयांची रक्कम गोठविली. न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीला ७ लाख ७५ हजार रुपये परत केले. ही कारवाई पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोळस, अजय पवार, श्रीकांत गोनेकर, सिमा टेकाम यांनी केली.