वर्धा: महिला, मुली यांनी धडाडी दाखवीत संकटाचा सामना केल्यास त्यांच्या शोर्याची प्रशंसा होतेच. आता तर सैन्यदलात महिलांनी अतुलनीय कामगिरी बजावल्याचे नुकतेच दिसून आले आहे. या घटनेत पण एका गृहिणीने जीवाची तमा नं बाळगता केलेले धाडस चर्चेत आहे.
घरी एकटी महिला असल्याचे Àहेरून दोन अज्ञात चोरट्यांनी घरात लूटमार करण्याचे उद्देशाने घरात प्रवेश केल्याची घटना स्थानिक यशवंतनगर येथे सोमवारी सायंकाळी ७.३०चे सुमारास घडली. चोरट्यानी घरात जबरी प्रवेश केला. त्यावेळी पुजा करीत असलेल्या महिलेचा हात पकडून पैसे व दागदागिन्यांची मागणी केली.यावेळी महिलेने प्रसंगावधान दाखवित झालेल्या झटापटीत एका चोरट्याच्या हाताला चावा घेतला.आरडाओरडा केली. तेव्हा या चोरट्यांनीसुद्धा महिलेच्या हातावर चाकुने वार करीत बचाव केला व आता काही खरे नाही म्हणत पळ काढला.
रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. २८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास यशवंत नगर येथील रहिवासी आरती शैलेश तन्ना(४६) या आपल्या घरात पुजा करीत असताना अचानक दोन अज्ञात युवकांनी घरात प्रवेश केला.सदर महिलेचा हात धरून आरडाओरडा न करता घरातील पैसे व दागदागिने काढून देण्याची मागणी केली. यावेळी महिलेने प्रसंगावधान दाखवित चोरट्यांच्या हाताला चावा घेतला.चोरट्यांनी शिवीगाळ करीत महिलेच्या हातावर चाकुने जबर वार केला.
परंतु महिलेने ओरड करताच दोन्ही अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभ्या केलेल्या स्वतःचे दुचाकीवरून पळ काढला.यावेळी काही वेळ दुचाकी सुरू होत नसल्याने त्यांनी काही अंतर दुचाकी धक्का देत नेली व पसार झाले.
घटनेचे गांर्भिय लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधिक्षक वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचेसह पोलिस फॉरेन्सिक चमू,डॉग स्काॅडला पाचारण करण्यात आले होते.वर्धा येथील एलसीबीचे तिन पथक अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी दाखल झाले.अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेणे सुरू होते.हिंगणघाट शहरात लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा यावेळी कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था याची चर्चा सूरू झाली आहे. सायंकाळी वर्दळ असतांना घरात घुसून जबरी चोरी करण्याचा हा प्रकार शहरात भिती निर्माण करणारा ठरत असल्याचे नागरिक बोलत आहे. भामट्याना धाक निर्माण होण्याची भावना व्यक्त होत आहे.