नागपूर : दारू पिणे गुन्हा नसलातरी विनापरवाना दारूच्या बाटल्या बाळगणे गुन्हा आहे. एक महिला जीटी एक्सप्रेसने प्रवास करताना दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याने आरपीएफने खाली उतरवले आणि अटक केली.

गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली.  महिलेने पांढुर्णा, मध्यप्रदेश येथून दारू खरेदी केली. दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेसने ती वर्धेसाठी निघाली. तिच्याकडे रेल्वेचे तिकीट नव्हते. त्यामुळे ती शौचालयाजवळ बसली होती.  नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच ती स्लीपर कोच मधून उतरली. तिच्या जवळ एक ट्राली बॅग, एक स्कूल बॅग होती. तसेच तिने संपूर्ण चेहरा कापडाने झाकलेला होता.

हेही वाचा >>> 12th Exam : विद्यार्थ्यांकडे ‘कॉपी’ सापडल्यास पर्यवेक्षकाची उचलबांगडी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती जनरल कोच मध्ये चढण्याच्या प्रयत्नात होती. चेहरा झाकल्याने पथकाला संशय आला. पोलिसांनी महिलेची विचारपूस केली. मात्र, तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे संशय अधिकच बळावला. तिच्याकडील दोन्ही बॅगची झडती घेतली असता त्यात २८ हजार रुपये किंमतीच्या ३८२ बाटल्या आढळल्या. ही महिला बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी करीत असल्याची बाब समोर आली. राणी गब्बर (४३), रा. वर्धा असे तस्करीत अडकलेल्या महिलेचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली.