आज जागतिक ओझोन दिन
जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे वातावरण, हवामान, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्यामुळे वृक्ष, मानव आणि सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळेच यंदा २०१६ च्या जागतिक ओझोन दिनाची संकल्पना ‘जागतिक प्रयत्नाने ओझोन व वातावरण बदलावर नियंत्रण’ अशी ठेवली आहे.
नासाच्या ‘ओझोने होल वॉच’तर्फे दररोज ओझोनवर लक्ष ठेवले जाते. विशेष म्हणजे, जागतिक प्रयत्नांमुळे ओझोन हा पूर्वीपेक्षा स्थिर असल्याचे आढळले आहे. भारतानेसुद्धा २०१५ पर्यंत प्रदूषक वायूंचे उत्पादन व वापर १० टक्के बंद केला आहे. वातावरणातील ओझोनमुळे सूर्याची विनाशकारी अतिनील किरणे गाळून पृथ्वीवर येऊन सजीव सृष्टीचे संरक्षण करतात. मात्र, मानवनिर्मित प्रदूषण करणारे क्लोरोफ्लुरो काबरेन्स, सोल्व्हन्टस, प्रोपेलन्टस, फ्रेओन्स, हलोन्स विशेषत: यातील क्लोरीन आणि ब्रोमिन हे वायू मोठय़ा प्रमाणात ओझोनला नष्ट करतात. क्लोरिनचा एक अणू सरासरी एक लाख ओझोनच्या अणूंना नष्ट करतो, यावरून प्रदूषणाची भयावहता लक्षात येते.
ध्रुव प्रदेशावर ओझोनचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे त्याला ‘ओझोन होल’ असेही म्हणतात. दरवर्षी अंटाक्र्टिका ध्रुवावर ६० टक्के, तर आर्टिक्टवर ३० टक्के ओझोनचे प्रमाण कमी होत असल्याचा निष्कर्ष आहे. त्याचा थेट परिणाम धृवावरील बर्फ वितळण्यावर होत असून त्यामुळे तेथील सजीव धोक्यात आले आहेत. बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळीही वाढत असून त्यामुळे भूभाग कमी होत आहे. आपल्या भूप्रदेशावरील प्रदूषणाचा ओझोन थरावर असाच परिणाम होऊन आपल्याकडील वातावरणातील ओझोन कमी होत असल्याने पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. सूर्याची अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्यामुळे सनबर्न, त्वचेचा कर्करोग आणि कॅटारॅक्ट व डोळ्यांचे विकार होतात. सजीवावर आणि वृक्षावर याचा वाईट परिणाम होऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. जमिनीवर ओझोन हा हरित वायू आणि प्रदूषक असून मानव व सजीवांना धोकादायक आहे. नैसर्गिकरीत्या तो जमिनीवर १० पीपीबी असतो, पण हवेत १०० पीपीबी असेल तर म्युकस व वृक्षांच्या कोशिकांसाठी धोकादायक ठरतो. उद्योगामुळे जमिनीवरील ओझोनचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्या भागात हवेत कोळसा जाळला जातो, हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईड ही प्रदूषके आहेत, वाहने व उद्योग जास्त आहेत, तेथे त्यावर सूर्यकिरणांची प्रक्रिया होऊन ओझोन वायू तयार होतो. हा वायू शेतीसाठी धोकादायक आहे. कारण, त्यामुळे पिकांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावते आणि उत्पन्न कमी होते. ओझोन वायू रबर, कारचे टायर, प्लास्टिकच्या वस्तू खराब करतो. वायूचे प्रमाण थोडे वाढल्यास श्वसनाचे विकार उद्भवून फुफ्फुसावर परिणाम करतात. दमा व हृदयरोग होण्याचीही शक्यता असते. सतत ओझोनच्या संपर्कात राहिल्यास अकाली मृत्यूसुद्धा संभवतो. त्यामुळे लोकांनी पर्यावरणाविषयी जागरुक व्हावे, असे आवाहन केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या क्षेत्रीय सशक्त समितीचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.