नागपूर : व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक हे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे वाघांसह इतरही वन्यजीवांना अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. हे अपघात टाळण्यासाठी केंद्राच्या संबंधित यंत्रणेला तात्काळ सांगून त्याचा पाठपुरावा करावा आणि वन्यप्राण्यांचा मार्ग मोकळा करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना के ल्या.

व्याघ्रसंवर्धन नियामक मंडळाची शुक्रवारी मुंबई येथील सह्य़ाद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृह व वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार आशीष जयस्वाल, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, विविध व्याघ्र प्रकल्पांचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक तसेच मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गासह रेल्वेमार्गावरही अपघात होतात. त्यामागील कारणांचा शोध घेऊन अपघात टाळण्यासाठीही प्रयत्न करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जंगलावर अवलंबून असणाऱ्यांना वनक्षेत्रालगतच्या परिसरातील स्थानिकांना विविध विभागांच्या योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची कामे दर्जेदार करावीत. राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच वाघ आणि अन्य वन्यजीवांसह संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन करताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ताडोबापुस्तकाचे प्रकाशन

व्याघ्रसंवर्धन नियामक मंडळाच्या बैठकीत २०२१-२०२२ या वर्षांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘ताडोबा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

विदर्भातील प्रकल्पांचा आढावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीत मेळघाट, नवेगाव -नागझिरा, ताडोबा-अंधारी, सह्यद्री व्याघ्र प्रकल्प, पेंच, बोर या प्रकल्पांच्या संचालकांनी प्रकल्पांच्या वाटचालीचा आढावा तसेच आर्थिक बाबींची माहिती सादर केली. प्रकल्पांतर्गत राबवण्यात येत असलेल्या स्थानिकांसाठीच्या योजना त्यामध्ये रोजगार संधी, पर्यटन सुविधा, जाणीव जागृती, निसर्ग शिक्षण तसेच पायाभूत विकास कामे, नाविन्यपूर्ण उपक्रम आदींची माहिती दिली.