यवतमाळ : ‘दिग्रस म्हणजे कबड्डी, अन कबड्डी म्हणजे दिग्रस’, हे समीकरण राज्यालाच नव्हे, देशाला माहिती आहे. आता दिग्रस हे कबड्डीसोबतच ज्युडोची पंढरी म्हणूनही नावलौकीक मिळवित आहे. ज्यूडोचे खेळाडू घडवण्यासाठी येथील प्रा. डॉ. रविभूषण कदम अविरत धडपडत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात असंख्य विद्यार्थ्यांनी तालुक्यापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत पदके, पुरस्कार तर मिळवलेच, पण अनेकांनी शासकीय नोकरीतही स्थान पटकावले. आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दिग्रस येथील हा बदल नोंद घेण्यासारखा ठरला आहे.

दिग्रसच्या बीएनबी महाविद्यालयात डॉ. रविभूषण कदम क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख आहेत. ते स्वत: उत्कृष्ट क्रीडपटू आहेत. ज्यूडो खेळासाठी त्यांना राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ मिळाला आहे. ते ज्यूडो फेडरेशन ऑफ इंडियाद्वारा ‘अ’ मानांकन प्राप्त पंचही आहेत. दिग्रस तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ज्युडो खेळात पुढे यावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मात्र येथील लोकांची मानसिकता हे मुख्य आव्हान त्यांच्यासमोर होते. वैयक्तिक खेळांकडे वळण्यास लोक फारसे तयार नव्हते. दिग्रसमध्ये लालमातीतील कबड्डीशिवाय दुसरा कोणताच खेळ तग धरू शकत नाही, याच मानसिकतेत येथील नागरिक होते. परंतु, डॉ रविभूषण कदम यांनी अनेक विद्यार्थ्यांना व पालकांना विश्वासात घेऊन ज्यूडो या क्रीडा प्रकारासाठी तयार केले. हळूहळू शहराच्या क्रीडा इतिहासाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. महाविद्यालयाच्या मैदानात ज्यूडोच्या सरावास सुरूवात झाली. अल्पावधीतच पुरस्कार, गौरव, प्रमाणपत्रे व पदके विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ लागल्याने दुसरी मुले देखील या नव्या खेळाकडे आकर्षित होऊ लागली.

खोखो, कबड्डीसारख्या सांघिक खेळांकडून वैयक्तिक खेळाकडे घेतलेले वळण सर्वांसाठी उत्साहवर्धक, फलदायी व सुखावणारे ठरले. प्रा. डॉ. कदम यांनी मागील २५ वर्षात कोणतेही शुल्क न आकारता नागपूर अमरावती विद्यापीठाचे अनेक ज्यूडो ‘कलरकोट होल्डर’ तयार केले. शालेय, महाविद्यालयीन, खुल्या व इतर विविध ज्यूडो स्पर्धेत सुवर्ण, रजत व कांस्य पदक पटकावणाऱ्यांची संख्या मोजणे आता अशक्य झाले आहे. एवढेच नव्हे तर असंख्य विद्यार्थ्यांनी ज्युडोमुळे मिळालेल्या अतिरिक्त गुणांच्या आधारावर क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरीही मिळविली आहे.

ज्यूडोसोबतच भारोत्तोलन, शक्तीतोलन, शरीर सौष्ठव, बॅडमिंटन, धनुर्विद्या, भाला फेक, थाळी फेक, टेबल टेनिस, क्रिकेट टेनिस आदी वैयक्तिक खेळ स्पर्धेत देखील डॉ. कदम यांचे विद्यार्थी राष्ट्रीय, राज्य, विभाग, विद्यापीठ स्तरावर विजयी ठरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ज्यूडो व इतर खेळांचे मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण घेत आहेत. त्यात मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे, हे विशेष. प्रा. डॉ. कदम यांच्या मार्गदर्शनात दिग्रस येथील श्रावणी डीके ही विद्यार्थिनी बहरीन येथे होऊ घातलेल्या तिसऱ्या युवा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी नुकतीच पात्र ठरली. अनेक ज्यूडो खेळाडू आशियाई, ऑलिम्पिक व इतर स्पर्धांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. दिग्रस शहराची ‘कबड्डीची पंढरी’ ही ओळख आता ‘ज्यूडोची पंढरी’ अशी होत आहे.