यवतमाळ : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करण्याची प्रथा अद्यापही कायम असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी जिल्ह्यात उघडकीस आला. जिल्हा प्रशासनाने वेळीच धडक दिल्याने तब्बल पाच अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचले. मुलींच्या वयाची १८ वर्षे पूर्ण व्हायच्या आधी लग्न करणे हा गुन्हा आहे. प्रशासनाकडून बालविवाहांबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येते, तरीही ग्रामीण भागात बालविवाहांचे प्रकार सर्रास सुरू आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यात पाच बालविवाह पार पडत असल्याची माहिती प्रशासनास मिळाल्याने बालसंरक्षण विभागाचे पथक ऐनवेळी लग्न मंडपात धडकले.
दिग्रस तालुक्यातील खेकडी, घाटंजी तालुक्यातील मुरली, उमरखेड तालुक्यातील कळमुला व देवसरी, महागाव तालुक्यातील फुलसावंगी या गावांमध्ये शुक्रवारी सकाळी ९ वाजता बालसंरक्षण कक्षाच्या विविध पथकांनी ही कारवाई केली. यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यंत्रणेला त्यासंदर्भात सतर्क राहण्यास सांगितले होते. खेकडी (ता. दिग्रस) येथे दोन, मुरली (ता. घाटंजी) येथे एक, कळमुला व देवसरी (ता. उमरखेड) येथे दोन, फुलसावंगी (ता. महागाव) येथे एक तर पांढरकवडा येथे एक अशा एकूण सात नियोजित बालविवाहांची गोपनीय माहिती अज्ञाताने प्रशासनाला दिली. त्या आधारे जिल्हा बालविकास अधिकारी प्रभाकर उपरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात तातडीने पथके रवाना करण्यात आली. बालिकांच्या वयाची शहानिशा केली असता पाच बालिका अल्पवयीन असल्याचे आढळले. दोन बालिकांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाली असल्याने त्यांना विवाह करण्यास संमती देण्यात आली.
हेही वाचा…अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दर घसरले..
सर्व अल्पवयीन बालिका, नियोजित वर, लग्न लावून देणारे नातेवाईक यांना बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. संबंधित पालकांनी मुलीला १८ वर्ष पूर्ण होईपर्यत तिचे लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र दिले आणि हे सर्व बालविवाह थांबविले. या कारवाईत दिग्रस, उमरखेड, महागाव, घाटंजी, पांढरकवडा पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, दिग्रसचे बालविकास प्रकल्प अधिकारी सखाराम माने, उमरखेडचे बाल विकास प्रकल्प अधिकारी परांडे, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी सहकार्य केले. बाल संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, बाल संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक फाल्गुन पालकर, सुपरवायझर गणेश आत्राम, मनीष शेळके, पूनम कनाके, शुभम कोंडलवार, अश्विनी नासरे, पूजा शेलारे यांनी ही कारवाई पार पाडली.