यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, अनेक तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान घाटंजी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. यामध्ये एक मृत अज्ञात असून दुसऱ्या घटनेत शिरोली येथील वृद्ध मजुराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
घाटंजी तालुक्यात संततधार सुरू असून, नदी-नाल्यांना जोरदार पूर आला आहे. कोपरी-येरंडगाव रस्त्यावर चिंचोली गावाजवळील पुलावरून गावकऱ्यांना वाघाडी नदीच्या पुरात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह वाहत जाताना दिसून आला. संजय तुरक पाटील आणि इतर ग्रामस्थांनी तो मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाह इतका वेगवान होता की, मृतदेह तरोडा गावाच्या दिशेने पुढे वाहून गेला. या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती आणि मृतदेहचाही शोध लागला नव्हता. हे शोधकार्य आजही सुरू होते.
दुसऱ्या घटनेत नाल्याला आलेल्या पुरात घाटंजी तालुक्यातीलच शिरोली येथील संभाजी भुऱ्या आत्राम (६०) यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी आत्राम हे पत्नी शांता यांच्या सोबत शेतात मजुरीचे काम करत होते. दि. ५ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता ते शेतात गेले होते. काम संपल्यावर पत्नी घरी परतली, मात्र संभाजी आत्राम यांनी ‘‘मी नंतर येतो’’ असे सांगून शेतातच थांबले. रात्री ८ वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे संभाजी आत्राम हे नाला ओलांडताना वाहून गेले असावेत, असा अंदाज होता. रविवारी माणिक विठ्ठल आत्राम यांच्या शेतालगत असलेल्या झाडाजवळ अडकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारपासून पावसाने जोर पकडला असून, अनेक ठिकाणी पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. वणी तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली, तर घाटंजी तालुक्यात एक म्हैस पुरात वाहून गेली. दरम्यान जिल्ह्यात मंगळवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नदी, नाल्यांच्या काठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सततच्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.