यवतमाळ : जिल्ह्यातील प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम पूर्ण झाला असून यात दुबार मतदारांचीही छाननी करण्यात आली. दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीमध्ये एकूण नऊ हजार ४८१ दुबार मतदार आहेत. आता त्यांच्या घरी जाऊन बीएलओ पुन्हा चौकशी करणार आहे. त्यांनी सांगितल्यानुसार एकाच मतदान केंद्रावर त्यांचे नाव कायम ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी येथे झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
जिल्ह्यात सर्वाधिक दुबार मतदार यवतमाळ शहरात आढळले आहेत. येथे सहा हजार २२१ दुबार मतदार आहेत. याशिवाय उमरखेड (४९३), पांढरकवडा (४०९), आर्णी (४००), दिग्रस (३४४), वणी (३४३), नेर (३२४), दारव्हा (३२०), पुसद (३१४), ढाणकी (९८) आणि घाटंजी शहरात ६४ दुबार मतदार आढळले.
जिल्ह्यात होत असलेल्या नरगपरिषद, नगरपंचायती निवडणकीत ५ लाख ६५ हजार २९४ मतदार आहेत. हे मतदार मतदानाचा हक्क बजावून २९३ नगरसेवकांची आणि ११ नगराध्यक्षांची निवड करणार आहेत. नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. नामांकन अर्ज हा पहिल्यांदा ऑनलाइन सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रती काढ़ून निवडणूक निर्यण अधिकाऱ्यांकडे हा अर्ज सादर करावा लागणार आहे. ही प्रक्रिया १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत चालणार आहे.
रविवारी नामांकन स्वीकारण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर नामांकन अर्जाची छाननी करून २१ नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेण्याची मुदत आहे. याच दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रभागातील लढत कोणात होईल, हे स्पष्ट होईल. २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मतदान २, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
या निवडणुकीत ‘अ’ वर्ग दर्जाच्या नगरपरिषदेत नगराध्यक्षाला १५ लाखांची, तर नगरसेवकांना पाच लाखांची खर्च मर्यादा आहे. ‘ब’ वर्ग दर्जा नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाच्या उमदवाराला ११ लाख, तर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारास तीन लाख रुपये खर्च मर्यादा आहे. ‘क’ दर्जाच्या नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ७ लाख ५० हजारांची खर्च मर्यादा, तर नगरसेवक उमेदवारांना अडीच लाख रुपयांची खर्च मर्यादा आहे. नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष उमेदवाराला सहा लाख आणि नगरसेवकांना दोन लाख २५ हजारांची खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने ठेवली आहे.
निवडणूक काळात मतदारांना विविध प्रकाराची प्रलोभने दिली जातात. यावर निर्बंध ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नगपरिषद क्षेत्रात ३७ स्थिर तपासर्ण पथके, ३३ फिरते तपासणी पथके, १२ व्हेडीओ व्हिर्डींग टीम आणि तीन मीडिया मॉनिटरिंग कमिटी तयार करण्यात आल्या आहेत. यांच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, ही खबरदारी घेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले.
१५३ प्रभाग; ६४९ मतदान केंद्र
यवतमाळ शहरातील ५८ प्रभागांत २४९ मतदान केंद्र राहणार आहेत. याप्रमाणेच पुसद येथील १५ प्रभागांत ६९ केंद्र, वणीतील १४ प्रभागांत ६५ मतदान केंद्र, उमरखेड शहरात १३ प्रभागांत ५० मतदान केंद्र, दिग्रस येथ १२ प्रभागांत ४४ मतदान केंद्र पांढरकवडा येथील ११ प्रभागांत ३२ मतदान केंद्र, दारव्हा येथे ११ प्रभागांत ३५ मतदान केंद्र, घाटंजीमध्ये १० प्रभागांत २० मतदान केंद्र, आर्णी येथे ११ प्रभागांत ३५ मतदान केंद्र, नेर शहरातील १० प्रभागांत ३१ मतदान केंद्र तर ढाणकी नगरपंचायतीमध्ये १७ प्रभागांत १९ मतदान केंद्र राहणार आहेत.
