यवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडलेले असताना, मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत वर्षा बंगल्यातील फर्निचरवर तब्बल ६० लाखांचा खर्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात केवळ पलंग व गादीसाठी २० लाख ४७ हजार रूपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. हा पलंग व त्यावरील गादी बघण्यासाठी शेतकरी विधवांना मुंबईत नेवून ‘देवाभाऊ महाराष्ट्र लुट दर्शन यात्रा’ काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
सरकारी नोंदीनुसार मलबार हिल येथील वर्षा बंगल्यावर पलंग व त्यावरील गादीसाठी निविदा (संदर्भ आयडी २५०९१७४१७१२००) २० लाख ४७ हजार रूपये शेड, स्वयंपाकघर प्लॅटफॉर्म व इतर बांधकाम दुरुस्तीसाठी निविदा (संदर्भ आयडी २५०९१७४१२४३००) १९ लाख ५३ हजार रूपये लाख, प्लास्टर व रंगकामासाठी निविदा (संदर्भ आयडी २५०९१८४९३५३०) १९ लाख ८७ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे. या तिन्ही निविदांची एकत्रित किंमत सुमारे ६० लाख रुपये असून, कामे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करायची आहेत. याच वर्षा बंगल्यावर मागील पाच वर्षांत तब्बल २० कोटी रुपयांचा खर्च झाल्याच्या नोंदी असल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे.
महाराष्ट्र लुटीचा हा नवा पॅटर्न आहे. शेतकरी मरत असताना मुख्यमंत्र्यांच्या पलंगासाठी २० लाखांवर खर्च होत असल्याने हा पलंग महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळावा, या अनुषंगाने ‘मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा’ आयोजित केल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली आहे. या यात्रेत यवतमाळसह विदर्भातील शेतकरी विधवा विशेष बसने मुंबईत जाऊन २० लाखांचा हा पलंग पाहणार आहेत. या यात्रेत वर्षा बंगला, नंदनवन, देवगिरी बंगला, मातोश्री, शिवतीर्थ व इतर नेत्यांच्या बंगल्यांचे दर्शनही घडवण्यात येणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची अवस्था गंभीर
महाराष्ट्रावर सध्या १० लाख कोटींचे कर्ज झाले आहे. खरीप हंगामात ६३ लाख हेक्टर पिके बुडाल्यामुळे ४० हजार कोटी रुपयांचा लागवड खर्च वाया गेला आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात पीककर्ज मिळाले नाही. सरकारी व सहकारी बँकांनी फक्त ४० टक्के कर्ज दिले, तर बहुतेक शेतकऱ्यांना खासगी वित्तीय संस्था, पतसंस्थांकडून तब्बल २४ टक्के व्याजदराने कर्ज घ्यावे लागले आहे. या संकटामुळे राज्यात दररोज ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. तर, मुख्यमंत्री शेकडो कोटी रुपये जाहिरातींवर उधळपट्टी करण्यात व्यस्त आहे. राज्यातील शेतकरी हलाखीचे जीवन जगत असताना मुख्यमंत्र्यांचे वैभवशाली जीवन शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ठरणार असल्यामुळे ही लुट दर्शन यात्रा काढत असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली आहे.