यवतमाळ : भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्द विराम झाला असला तरी पाकिस्तान कुरापती करीत आहे. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून, शत्रुंच्या नापाक कारवायांना नेस्तनाबूत करत भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे, अशी शिवसेनेची मागणी आहे, असे प्रतिपादन शिवसेना मंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

राष्ट्रप्रथम ही भावना मनात बाळगून सर्व भारतीय जनता सैन्यासोबत आहे, हा संदेश देण्यासाठी शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीने आज रविवारी स्थानिक शिवतीर्थ येथे तिरंगा सन्मान व भारतीय सैन्यातील माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्यासह कालिंदा पवार, माधुरी अराठे, वैशाली मासाळ, विशाल गणात्रा आदी उपस्थित होते.

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांचे नऊ केंद्र उध्वस्त केले. त्यानंतर भारतीय सैन्याने कडवी झुंज देत पाकिस्तानला बेजार केले. अखेर अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर दोन दिवसांसाठी शस्त्रबंदी झाली. मात्र पाकिस्तानने या कराराचे उल्लंघन करत हल्ले सुरूच ठेवले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्व भारतीय एकवटले असून, जात, पात, धर्म विसरून भारतीय म्हणून आज प्रत्येकजण भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे, असे मंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले.

शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र पाठवून पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेण्याची विनंती केली आहे. सोबतच पाकिस्तानात दडून असलेल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना भारताने ताब्यात घ्यावे, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतात कुरापती केल्यास पाकिस्तानवर हल्ला करण्याची पूर्ण मुभा भारतीय सैन्यास द्यावी आणि भविष्यात पाकिस्तानने दहशतवादास थारा देवू नये, अशा अटी भारताने शस्त्रबंदी करताना पाकिस्तानला घालाव्यात, अशी मागणी शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे, असे संजय राठोड यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय सीमेवर सेवा देवून निवृत्त झालेल्या गौतम सोनोने, वसंत केंद्रे, परशराम सामृतवार, जीवन कोवे, गणेश रहाटे, पवन जगताप, दीपक वीर, जगतराम चव्हाण, घनश्याम वैरागडे, मुकेश महाराज चुडे, अंबादास कावरे, किसन व्यवहारे, मोरेश्वर शेलार या माजी सैनिकांचा यावेळी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच या सैनिकांच्या सन्मानार्थ उपस्थितांनी तीनवेळा सलामी देवून त्यांना मानवंदना दिली. यानंतर उपस्थित माजी सैनिक, पालकमंत्री संजय राठोड, शिवसैनिक व नागरिकांनी तिरंगा हातात घेवून संविधान चौकापर्यंत पायी रॅली काढून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.