लोकसत्ता टीम

यवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. आज पहाटे ४ वाजता यवतमाळसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतीचे पूर्णत: नुकसान केले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

या आठवड्यात जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून कुठे ना कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान पावसामुळे झाले आहे. एका महिलाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाल तर, अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी काही भागात पाऊस कोसळला. मात्र शनिवारी पहाटे ४ वाजतापासून पावसाने अनेक ठिकाणी थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ शहरात सखल भागात पाणी साचले होते.

आणखी वाचा-रणसंग्राम लोकसभेचा : पूर्व नागपुरात भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत; परप्रांतीयांचा कौल निर्णायक ठरणार

बेसमेंटमधील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्यावर्षीच्या पावसाची आठवण आजच्या वादळी पावसाने झाली. अवकाळी पावसामुळे गहू, तीळ, भूईमूग या पिकांसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान सर्वत्र झाले आहे. अनेक भागात झाडांची पडझड झाली. वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने सकाळपर्यंत अनेक भागात वीज नव्हती. अद्यापही ढगाळी वातारवण असून, पाऊस राहून राहून कोसळत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री म्हणतात, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असताना, शासन, प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी, अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक भागात मोठे नुकसान झाले. सध्या आचारसंहिता सुरू असली तरी, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्याचे सांगितले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकरी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर नाराज असल्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून ३५ हजार कोटींपेक्षा अधिक मदत केल्याचा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.