यवतमाळ : जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढू लागला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, खरी चुरस २६ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीनंतर आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणूक चिन्हांच्या वाटपाने स्पष्ट होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, ज्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तब्बल १९४ मुक्त चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत.
निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवाराचे नाव मतदारांच्या सहज लक्षात राहीलच असे नाही, पण निवडणूक चिन्ह हे मतदारांच्या, विशेषत: ग्रामीण आणि कमी शिक्षित मतदारांच्या, मनात त्वरित स्थान मिळवते. यामुळेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये लक्षवेधक आणि आकर्षक चिन्ह मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवारांचा कल असतो.
निवडणूक चिन्ह वाटपासाठी विशिष्ट क्रम पाळला जातो. राष्ट्रीय स्तरावरील पाच पक्ष, राज्यस्तरीय पाच पक्ष आणि इतर राज्यातील राज्यस्तरीय नऊ पक्षांची चिन्हे राखीव आहेत. याव्यतिरिक्त, राज्य निवडणूक विभागाने ७ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या, परंतु अमान्यताप्राप्त असलेल्या ४१६ नोंदणीकृत पक्षांनादेखील चिन्हांच्या वाटपात प्राधान्य दिले जाते. या सर्वांनंतर शिल्लक राहणारी मुक्त चिन्हे अपक्ष उमेदवारांना दिली जातात.
अपक्षांसाठी १९४ चिन्हांची यादी
अपक्ष उमेदवारांसाठी उपलब्ध असलेल्या १९४ चिन्हांमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचा समावेश आहे, जे मतदारांना पटकन आकर्षित करू शकतात. या चिन्हांमध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ आणि शेतीविषयक साधनांवर आधारित चिन्हे आहेत. ब्रेड, बिस्कीट, केक, आईस्क्रीम, सफरचंद, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फुलकोबी, मका, भुईमूग, कलिंगड, पेरू, ऊस, नारळाची बाग इत्यादी चिन्हांचा यात समावेश आहे. याव्यतिरिक्त, घरगुती वस्तूमध्ये बादली, कॅमेरा, टॉर्च, बेंच, पुस्तक, कढई, माइक, पत्रपेटी, कुलर, फ्रीज, सोफा, वाहनांमध्ये ट्रक, ट्रॅक्टर, स्कूटर आणि इतर उपकरणांमध्ये शिलाई मशीन, सेफ्टीपिन, पेन, शार्पनर, स्टूल, इंजेक्शन यांसारख्या चिन्हांचाही समावेश आहे. उमेदवारांना बशी, कपबशी, घागर, खलबत्ता यांसारखी सोपी चिन्हेही उपलब्ध आहेत.
उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक अपक्ष उमेदवाराला त्यांच्या पसंतीची तीन निवडणूक चिन्हे द्यावी लागतात. समान चिन्हांची मागणी एकापेक्षा जास्त उमेदवारांकडून झाल्यास, निवडणूक अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण होतो. अशावेळी, ‘प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार चिन्हांचे वाटप केले जाते. यासाठी उमेदवारी अर्जावर तारीख आणि वेळदेखील नोंदवली जाते. त्यानुसार, २५ नोव्हेंबरला चिन्हांचे वाटप झाल्यानंतर, कोणता अपक्ष उमेदवार ‘ब्रेड’ मिळवतो आणि कोण ‘बिस्कीट’ घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
