यवतमाळ : स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीकडून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. न्यायालयात दाखल प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज आहेत. प्रारूप प्रभाग रचनेसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूकपूर्व तयारी सुरू आहे. त्यानुसार शासनाने संबंधित नगरपरिषदांची सदस्यसंख्या निश्चित केली आहे.

नगरपरिषदांची निवडणूक अडीच ते तीन वर्षांपूर्वीच होणार होत्या. मात्र, दाखल प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीत अनुसूचित जातीसाठी ३३, अनुसूचित जमाती २३,नागरिकांचा मागास प्रवर्ग ८० तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी १५७ जागा राखीव आहेत. महिला प्रवर्गात अनुसूचित जाती १८, अनुसूचित जमाती १२, नागरिकांचा मागास प्रवर्ग ४२ आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ७७ जागा आरक्षित केल्या असून प्रभाग रचनेनंतर यांची सोडत होणार आहे.

जिल्ह्यात यवतमाळ, उमरखेड, दिग्रस, पुसद, वणी, आर्णी, दारव्हा, घाटंजी, नेर-नबाबपूर, पांढरकवडा या दहा नगरपरिषदा आहेत. दोन लाख ४८ हजार ९३९ लोकसंख्या यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात असून, यवतमाळ नगरपरिषदेला ‘अ’ दर्जा प्राप्त आहे. सात नगरपंचायतीपैकी ढाणकी नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे. ढाणकी नगरपंचायतीच्या हद्दीत १७ हजार २६७ लोकसंख्या आहे. यासाठी १७ सदस्य संख्या असून महिलांसाठी ९ जागा राखीव आहे. यामध्ये एससी, एसटी प्रत्येकी दोन, नामाप्र पाच, सर्वसाधारण आठ, एससी, एसटी महिला प्रत्येकी एक, नामाप्र महिला तीन, तर सर्वसाधारण महिला चार अशा जागा आरक्षित केल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा २५ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना असून नगरविकास विभागाच्या आदेशानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायतस्तरावर १८ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचनेची यादी प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांतील ग्रामपंचायती नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये विलीन झाल्या आहेत, तर काही ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. या फेरबदलामुळे कुठे लोकसंख्येत घट, तर कुठे वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या प्रारूप प्रभाग रचनेत बदल होण्याची दाट शक्यता असून या प्रभाग रचनेनंतरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींचे बिगुल वाजणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यवतमाळ नगरपरिषदेत ५८ सदस्य

यवतमाळ नगरपरिषदेत अनुसूचित जाती ९, अनुसूचित जमाती ५ , नामाप्र १६, सर्वसाधारण २८ तसेच महिला प्रवर्गातून अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती ३, नामाप्र ८ तसेच सर्वसाधारण प्रवर्गात १३ जागा राखीव आहेत. त्यामुळे यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत दिसणार आहे.