यवतमाळ : घाटमाथ्यावर वसलेले यवतमाळ शहराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. शहराच्या आसपास अनेक पर्यटन स्थळं पावसाळ्यात हिरवा शालू पांघरतात आणि पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. शहरालगत जांब मार्गावर असलेली बहिरम बुवाची टेकडी शहरवासीयांसाठी ताण घालविणारे स्थळ झाले आहे.

यावर्षी मे महिन्यातच सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होऊन सृष्टी हिरवाईने नटली. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने कोमेजलेल्या वृक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे. नागपूर – तुळजापूर महामार्गार यवतमाळ शहराच्या बाह्यवळण मार्गावर असलेल्या जांब मार्गावरीलवरील प्रसिद्ध बहिरमदेव टेकडी परिसरातील निसर्ग संपदेचे सौंदर्य खुलल्याने पर्यटकांची येथे गर्दी वाढली आहे.

यवतमाळ ते जांब रोडवरील उंच टेकडीच्या पायथ्याशी वैदर्भीय दैवत श्री बहिरम देवस्थान आहे. जंगलव्याप्त या क्षेत्राचे महत्व याच देवस्थानामुळे वाढले. सध्या अवकाळी पावसाचा जोर वाढल्याने इथली नैसर्गिक संपदा बहरली आहे. वनराईने दाटलेल्या या भागात त्यामुळेच पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. या टेकडीवर ट्रेकिंग करण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस व वन विभागातील अधिकारीही नियमित येतात. टेकडीच्या पायथ्याशी वाहणारी वाघाडी नदी, टेकडीवर असलेले प्राचीन शिवमंदिर, चालण्यासाठी असलेला पूर्णतः मातीचा ‘वॉकिंग ट्रॅक’ यामुळे ही टेकडी पर्यटकांसह सामान्य नागरिकांनाही खुणावत असते.

येथील निसर्गाच्या कुशीत गेल्याने ताण निवळतो. त्यामुळे निसर्गप्रेमींसह आपला रोजचा तणाव कमी करण्यासाठीही दररोज पहाटे आणि संध्याकाळी येथे नागरिकांची लगबग वाढली आहे. सकाळी योग, व्यायामासाठी मोठ्या संख्येने येथे नागरिक येतात. सध्या अवकाळी पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने वसंत ऋतू आणि पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आज3. .येथूनच पुढे जांब, नाकापार्डी, खरद तसेच पुढे रुई, वाई अकोलाबाजार यासारखी मोठी गावे वसली आहे. हा संपूर्ण मार्ग दाट जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गाने फिरण्याचा आनंद कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव देणारा आहे. या कारणाने या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ दिसून येते. याशिवाय इथली बहिरम देव यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीला ही अस्सल ग्रामीण ढंगातील यात्रा येथे भरते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रेकिंग, सहल, वनभोजनासाठी उत्तम ठिकाण

हा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत येतो. मात्र कुटुंबीयांसमवेत तुम्हाला चांगला वेळ व्यतीत करायचा असेल तर बहिरम देव टेकडी चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी टेकडी चढण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. याशिवाय येथून सूर्योदय व सूर्यास्त या दोन्ही वेळचे सौंदर्य अनुभवता येते. सहलीसाठी हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आनंद देणारे आहे. जंगलव्याप्त अशा भागात पक्ष्यांच्या विविध प्रजाती तसेच प्राण्यांचा संचार आहे. टेकडीवर आणि जंगलात त्याच्या पाऊलखुणा जागोजागी दिसतात.