यवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने आज बुधवारी जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ दिला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जनजीवनही पावसामुळे त्रस्त झाले आहे.
जिल्ह्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने आज बुधवारी जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे. या काळात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्कत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज सकाळपासून अनेक भागात पाऊस सुरू आहे.
मागील २४ तासात पावसाने जिल्ह्यातील २९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. याचा चार तालुक्यांना फटका बसला. प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पाच प्रकल्पांचे ५८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाने पुढदील २४ तासांकरिता एलो अलर्ट जाहीर केला असल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे.
जिल्ह्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. या पावसाने दारव्हा, वणी, कळंब आणि आर्णी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला, यासह इतर १० तालुक्यांतील २९ मंडळांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला. या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामध्ये दिग्रस तालुक्यातील दिग्रस, कलगाव, तिवरी, तुपटाकळी, सिंगद मंडळांचा समावेश आहे. आर्णी तालुक्यातील लोनबेहळ, पुसद तालुक्यातील ब्राम्हणगाव, जांब बाजार, उमरखेडमधील निंगनूर, महागाव तालुक्यातील महागाव, मोरथ, गुंज, फुलसावंगी मंडळांचा समावेश आहे.वणी तालुक्यातील वणी, भालर, शिंदोला, कायर, रासा, शिरपूर, गणेशपूर, झरी जामणीमधील खडकडोह, मुकुटबन, केळापूरमधील चालबर्डी, घाटंजीमधील कुर्ली, राळेगावमधील झाडगाव, धानोरा, वाढोणा, वडकी, किन्ही या मंडळांचा समावेश आहे. सण-उत्सवाच्या काळात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नागरिकांची तारांबळ उडत असून, ग्रामीण भागात घराच्या पडझडीमुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत.
या अतिवृष्टीने २९ मंडळांत सात हजार ७३० हेक्टरवरील पीक खरडून गेले. कापूस, सोयाबीन ही पिके हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. भाजीपाला, फळपीक आणि फुलांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर पडली आहे.
तिघे जण वाहून गेले
पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे दाम्पत्य पुरात वाहून गेले. गावातील मोहन सकरु राठोड आणि त्यांची पत्नी सुलोचना हे सोमवारी संध्याकाळी सिंगरवाडी-धानोर पुलावरून रस्ता ओलांडताना प्रवाहात वाहून गेले. मंगळवारी दुपारी सुलोचना मोहन राठोड यांचा तर सायंकाळी मोहन राठोड यांचा मृतदेह सापडला. यवतमाळ तालुक्यातील बोरी अरब येथे एक व्यक्ती पूल ओलांडताना अडान नदीच्या पुरात वाहून गेला.
पाच प्रकल्पांचे ५८ दरवाजे उघडले
प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस बरसत असल्यान ईसापूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. या ठिकाणावरून १८ हजार ४९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अधरपूस प्रकल्पाचे १० दरवाजे उघडण्यात आले. येथे नदीपात्रात ५१० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अडाण प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. या ठिकाणावरून २२८ क्यसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाचे २१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या ठिकाणावरून ५५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अरुणावती प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहे. अरुणावती नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.