यवतमाळ : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याने देशपातळीवर मोठा नावलौकीक मिळवला आहे. देशातील ४३८ राष्ट्रीय उद्याने व वनोंद्यानांमध्ये करण्यात आलेल्या मूल्यांकनामध्ये टिपेश्वरने देशात ४४ वा आणि महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या मूल्यांकनामध्ये ७८.१३ इतके गुण मिळवत ‘उत्तम व्यवस्थापन’ या सर्वोच्च श्रेणीत टिपेश्वरचे नाव झळकले आहे. या अभयारण्याची स्थापना सन १९९७ मध्ये झाली असून सध्या हे अभयारण १४८.६२ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे. गेल्या काही वर्षांत हे अभयारण्य वाघांमुळे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण झाले आहे. येथे २० च्या वर वाघांचे वास्तव्य आहे. टिपेश्वर अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, चितळ, सांबर, रानकुत्रे, माकड, घोरपड यांसारख्या वन्य प्राण्यांसह विविध प्रकारचे पक्षी आणि दुर्मीळ औषधी वनस्पतींनी नटलेले जैवविविधतेचे भांडार आहे.
योग्य व्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरणीय शाश्वतता आणि स्थानिक सहभाग यांच्या जोरावर टिपेश्वर अभयारण्याने देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सन २०२० ते २०२५ या कालावधीत विविध अभयारण्यांमधील उपलब्ध सुविधा, संरक्षणात्मक उपक्रम, विकास कामे व एकूण व्यवस्थापन या आधारांवर देशभरातील अभयारण्यांचे मूल्यांकन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षस्थानी आसाममधील सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख एन. के. वासू होते. या समितीत डॉ. रथीन बर्मन, डॉ. रितेशकुमार, डॉ. भिवेश पांडव हे सदस्य होते. सध्या पावसाळ्यामुळे अभयारण्यातील सफारी बंद झाली आहे. मात्र टिपेश्वर अभयारण्याने राष्ट्रीय मूल्यांकनात बाजी मारल्याने भविष्यात पर्यटन वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे.
भविष्यात व्याघ्र प्रकल्प म्हणून दर्जा?
या समितीने टिपेश्वर अभयारण्यातील सुविधांचा दर्जा अधिक उत्तम करण्यासाठी अनेक सुधारणा सुचविल्या. त्यात ‘इको सेंन्सेटिव्ह झोन’साठी झोनल मास्टर प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासोबतच लगतच्या वनक्षेत्रांचा समावेश करून टिपेश्वर अभयारण्यास भविष्यात व्याघ्र प्रकल्प म्हणून दर्जा देणे, भूप्रदेशातील भ्रमंती करणाऱ्या वाघांचे प्रभावी निरीक्षण करणे, स्थलांतरित गावांचे प्रश्न सोडविणे, रिक्त जागा भरणे, निसर्ग निर्वाचन केंद्राची स्थापना करणे आदी सुविधा सुचविण्यात आल्या, अशी माहिती वन्यजीव विभाग पांढरकवडा येथील विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांनी दिली.