यवतमाळ : येथील वाघापूर परिसरात बुधवारी रात्री उशिरा एका पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेत झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर गॅस सिलेंडर घालून तिचा निर्दयपणे खून केल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात २४ तासात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव इंद्रकला विजय जयस्वाल (४७) असून आरोपी पतीचे नाव विजय शंकरलाल जयस्वाल (५३) असे आहे. पती विजय याला पत्नी इंद्रकलाच्या वर्तणुकीवर संशय होता. या कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. बुधवारी रात्री दोघांत पुन्हा एकदा वाद उफाळून आल्यावर रागाच्या भरात विजयने घरात असलेला गॅस सिलेंडर उचलून थेट इंद्रकलाच्या डोक्यावर घातला. या जोरदार आघाताने इंद्रकला जागीच कोसळली. यामध्ये डोक्यातून रक्तस्राव होवून तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी विजय जयस्वाल याला अटक केली आहे. पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.

२४ तासांपूर्वी पुसद येथील टिपू सुलतान चौकात पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती.सानिया परवीन मोहम्मद आसिफ कुरेशी (२१) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पतीने घटनेनंतर स्वतः वसंतनगर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दोन्ही घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हेगारी वाढली

शहरासह जिल्हाभरात गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. यंदाचे वर्ष खुनाच्या घटनांनी उजाडले. ही खुनाची मालिका आजही सुरू आहे. जून महिन्यापर्यंत ३० खून झाले होते. या महिन्यात आणखी खुनाच्या घटनांनी यवतमाळचे सामाजिक स्वास्थ धोक्यात आणले आहे. या घटनांसोबतच शरीरदुखापती, अघोरी कृत्य, बलात्कार, चोरी, दरोड्याचा प्रयत्न, घरफोड्या तसेच क्षुल्लक कारणावरून आत्महत्यांच्या घटनांची नोंद पोलीस दफ्तरी होत आहे. गत काही महिन्यात शहरात पूर्ववैमनस्यातून खुनाच्या दोन घटना घडल्या. जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी थेट खून करण्यात आले होते. याशिवाय जांब रोडवर एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्याआधी भर दिवसा दत्त चौक परिसरात तरुणाला काही तरुणांनी संगनमत करून संपविले. या प्रकरणातील संशयित आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे. त्यामुळे टोळीयुद्धातून पुन्हा रक्तरंजित प्रकरणे घडण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षकांनी या वाढत्या गुन्हेगारीवर सर्व ठाणेदारांची बैठक घेऊन गुन्हे रोखण्यासाठी विशेष खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.