यवतमाळ : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या दडपणात येऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिग्रस शहरातील महेश नगर येथे रविवारी रात्री घडली. लकी सुनील चव्हाण (१८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
लकीने नुकतीच नांदेड येथे राहून नीट परीक्षेची तयारी केली होती. काल रविवारी झालेल्या नीट परीक्षेनंतर पेपर कठीण गेल्याची भावना त्याने आपल्या कुटुंबियांजवळ व्यक्त केली होती. त्याने गुणांची वारंवार पडताळणी करून बघितली असे सांगण्यात येते. अपेक्षित निकाल न लागल्यास आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरेल या भीतीने मानसिक तणावात असलेल्या लकीने रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
लकीचे वडील सुनिल नुरसिंग चव्हाण हे शिक्षक असून सध्या फुलउमरी (ता. मनोरा, जि. वाशिम) येथील शाळेत कार्यरत आहेत. मुलाच्या या अचानक निर्णयामुळे चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.लकीने नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने आत्महत्या केल्याची माहिती दिग्रस पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. तो परीक्षेनंतर मानसिक तणावात असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले, अशी माहिती वाघ यांनी दिली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परीक्षेचे मानसिक ओझे किती जीवघेणे ठरू शकते, याचे हे अत्यंत वेदनादायक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजासाठी सावधानतेचा इशारा आहे. परीक्षांचा निकाल हा आयुष्याचा शेवट नाही, ही जाणीव पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे अत्यावश्यक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
दोन हजार ८५७ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा
रविवारी यवतमाळमध्ये नऊ परीक्षा केंद्रांवर एकूण दोन हजार ९२६ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यापैकी एकूण ६९ विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित होते. दोन हजार ८५७ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. परीक्षा केंद्रांवर यावेळी शासकीय शाळा महाविद्यालयांमधील शिक्षक, अध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच प्रत्येक केंद्रावर कार्यकारी दंडाधिकारी म्हणून एक तहसीलदार असे जिल्ह्यातील एकूण नऊ तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली होती. ३०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या कामाकरिता नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व इतर सर्व अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.