यवतमाळ : पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील धावपटू देव श्रीरंग चौधरी या तरूणाने दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात पार पडलेल्या प्रसिद्ध कॉम्रेड अल्ट्रामॅरेथॉनमध्ये ९७ वर्षांचा विक्रम मोडून नवीन विक्रम स्थापित केला. देवने या स्पर्धेत ८६ किमीचे अंतर केवळ सात तास चार मिनिटांत पार केले व तो पहिलाच ‘फास्टेस्ट इंडियन’ ठरला. भविष्यात स्वत:चाच हा विक्रम मोडायचा असून आणखी कमी वेळात ही मॅरेथॉन पूर्ण करायची आहे, असे देव चौधरी याने सांगितले. येथील शिव जिममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

पुसदमधील श्रीरामपूरमध्ये वास्तव्याला असणारा देव मैदानावर दररोज ३० किलोमीटर धावतो. आठवड्यात ८०० किमी तर महिन्याला साडेतीन हजार किलोमीटरची रनिंग तो करतो. ‘धावणारा देव’ अशीच आपली ओळख झाली आहे, असे तो म्हणाला. दररोजच्या सरावाने धावण्याची कार्यक्षमता वाढल्याचे त्याने सांगितले. शाकाहार घेत असून पालेभाज्या, कडधान्य, दूध, केळी आणि दिवसातून भरपूर पाणी पितो, त्यामुळे आरोग्य उत्तम राखता आले, असे त्याने सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खडतर अशा कॉम्रेड मॅरेथॉनकरीता दोन वर्षांपासून सराव करत होतो. मात्र गेल्या वर्षी आर्थिक परिस्थितीमुळे भाग घेता आला नाही. यावर्षी अनेकांनी मदत केल्याने तिथे पोहचता आले. सर्व मदत करणाऱ्यांना स्पर्धेत रौप्य पदक पटकावून पहिला भारतीय विजेता होण्याची भेट दिली, असे देव याने सांगितले. मदत करणारे व्यक्ती, संस्था आणि भारतीयांच्या आशीर्वादानेच जागतिक विक्रम करता आला, असे देव म्हणाला.

हेही वाचा…अमरावती : स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका केव्‍हा? इच्‍छुक उमेदवार अस्‍वस्‍थ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडील शेती करतात, तर आई गृहिणी असल्याचे त्याने सांगितले. शालेय जीवनापासूनच धावण्याचे वेड होते. हे वेड आता ध्येय झाले आहे. क्रीडा क्षेत्रातच करीअर करायचे आहे. मात्र पोलीस भरतीची तयारी सुरू आहे. निवड झाली तर महाराष्ट्र पोलिसांकडून जागतिक स्पर्धा गाजवू, असे देव चौधरी म्हणाला. पोलीस भरतीत धावणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेत देव वयाच्या अठराव्या वर्षापासून विविध स्पर्धेत धावत आहे. त्याने आतापर्यंत अनेक मॅरेथॉनमध्ये पारितोषिके आणली आहे. २०२२ मध्ये या बेंगलोर येथे १६१ किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत तो सतत १८ तास २४ मिनिटे धावला. त्याचा हा विक्रम अद्याप कोणीही मोडला नाही. दिल्ली येथे झालेल्या इंडियन बिंग डॉंग बॅकयार्ड अल्ट्रा या वर्ल्ड चॉम्पियनशिपसाठी त्याने भारतीय चमूचे प्रतिनिधित्व केले, अशी माहिती यावेळी विदर्भ कुस्तीगीर संघटनेचे कोषाध्यक्ष व क्रीडा प्रशिक्षक अविनाश लोखंडे यांनी दिली.