बुलढाणा: तालुक्यातील धाड येथील अजब लग्नाची ही गजब गोष्ट आहे. आधीच विवाहित असलेल्या महिलेसोबत लग्न लावून २८ वर्षीय युवकाची फसवणूक करण्यात आली . हे लग्न शेवटी पोलीस ठाण्या पर्यंत पोहोचले.अविवाहित तरुणांची फसवणूक करणाऱ्या मंडळीचे रॅकेटच असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले.
या प्रकरणी पीडित युवकाच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी चार जणांना अटक केली, तर दोघे फरार आहेत. वैभव विठ्ठल माळोदे (वय २८, राहणार धाड तालुका आणि जिल्हा बुलढाणा ) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकाराने त्याला जबर मानसिक धक्का तर बसलाच पण नातेवाईक व गावकऱ्यात हसे देखील झाले. वैभव याने प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, काही व्यक्तींनी त्याला लग्नासाठी मुलगी असल्याचे सांगून भरपूर पैसे व दागिने उकळले. नंतर कोमल दिलीप पाटील (राहणार इंदिरानगर, शेगाव जिल्हा बुलढाणा) या विवाहित महिलेशी त्याचे लग्न लावले. प्राथमिक तपासात हे प्रकरण फसवणूक करणारे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.
आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून लग्न लावल्याचे स्पष्ट झाले आहे. धाड पोलिसांनी कोमल पाटील, योगेश माधव थोरात, प्रतिभा ऊर्फ हिरा गांगुर्डे (राहणार पेंढुर्ली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक) आणि साक्षी गणेश कालाप या चौघांना अटक केली आहे.या प्रकरणातील नितीन भरत जमधाडे (राहणार नाशिक) आणि अक्षय देवराज गजभरे (राहणार पुसद, जिल्हा यवतमाळ) हे दोघे फरार असून. त्यांचा धाड पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहे . पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींना बुलढाणा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या चौघा आरोपीना येत्या ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लग्नाच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करणारी टोळी राज्यात सक्रिय असल्याचे पोलिस तपासातून पुढे येत असून, या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक परमेश्वर केंद्रे आणि त्यांच्या पथकाकडून केला जात आहे. पोलीस कोठडी दरम्यान चार आरोपी कडून त्यांनी यापूर्वी केलेले कारनामे, त्यांनी किती पालक आणि युवकांची फसवणूक केली, अशी किती लग्ने लावली याचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनेक धक्का दायक माहिती बाहेर येण्याची शक्यता असल्याने या घटनेच्या पुढील तपासाकडे धाड व परिसर वासियांचे लक्ष लागले आहे