नागपूर: देशात बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप वारंवार विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जातो. परंतु केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टाटा कंपनीला कौशल्य प्रशिक्षणातून पाच वर्षांत पाच लाख तरुणांना रोजगाराचे लक्ष्य दिले आहे. यासाठी अनेक कल्पनाही गडकरी यांनी शनिवारी हाॅटेल रेडिसन ब्लू येथे झालेल्या कार्यक्रमात मांडल्या.
कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने आमदार अभिजित वंजारी, चरनसिंग ठाकूर, माजी आमदार अनिल सोले, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, टाटा स्ट्राइव्ह कंपनीचे अमेय वंजारी उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, टाटा स्ट्राइव्ह कंपनीसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार कंपनी येथील पाच लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षणातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय दिले गेले आहे. हे ध्येय खूप मोठे आहे. परंतु योगायोगाने मी देत असलेले ध्येय नेहमी पूर्ण होतात. या प्रकल्पानुसार विदर्भातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक आमदार ५ हजार तरुणांना येथे विविध क्षेत्रातील कौशल्य विकासाकरीता पाठवतील. या सगळ्यांना रोजगार देण्याचे ध्येय मी टाटा कंपनीला दिल्याचेही गडकरी यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात स्टिल हब होऊ बघत आहे. येथे ७.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. येथे ६५ ग्रेडचे स्टिल सापडले आहे. हे स्टिल जगातील सर्वोत्तम असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
एमएससी बाॅटनी शिक्षण घेतलेले आरबीआयमध्ये नोटा मोजतात
बी. काॅम., एम. काॅम., एम. एससी. शिक्षण घेण्यात काही गैर नाही. परंतु वनस्पती शास्त्र विषयात (एम एससी बाॅटनी) शिक्षण घेतलेले व भारतीय रिझर्व बँकेत (आरबीआय) नोकरी करणारे लोक नोटा मोजण्याचे काम करतात, असे विनोदाने गडकरी म्हणाले. यात गैर नाही. परंतु कौशल्य शिक्षण घेतलेल्या विषयात काम केल्यास उत्पादन क्षेत्रात चांगले दर्जेदार उत्पादन तर इतर क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळामुळे कामाचा दर्जा सुधारत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. जर्मनीमध्ये बारावीपर्यंत समान शिक्षण तर त्यानंतर कौशल्यावर आधारीत शिक्षण घेतले जाते. त्यामुळेच जर्मनी दर्जेदार वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात सर्वात पुढे असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीप्रमाणे स्मार्ट व्हिलेज योजना गरजेची
स्मार्ट सिटीप्रमाणेच आपल्याकडे स्मार्ट व्हिलेज योजना राबवण्याची गरज आहे. याकडे लक्ष न दिल्यास शहरी भागात ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुणांची संख्या वाढून झोपडपट्टी वाढेल. त्यातून नवीन अडचणी तयार होतील. त्यामुळे गावातही चांगले उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास या अडचणी येणार नाही, असेही गडकरी म्हणाले.
