नागपूर : ‘उडता पंजाब’च्या दिशेने वाटचाल करणारे उत्तर नागपूर अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे वास्तव ‘लोकसत्ता’ने चव्हाट्यावर आणले होते. त्याला काही दिवसही होत नाही, तोच या भागातील आणखी एका नशेची धुंदी चर्चेत आली आहे. अंमली पदार्थांच्या तुलनेत खिशाला परवडणारा पर्याय, कमी जोखीम आणि बोभाटा होण्याच्या अल्प शक्यतेतून झोपडपट्ट्यांमधील तरुण गुंगी आणणाऱ्या औषधांच्या आहारी जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात हे तरुण नैराश्याच्या दरीत लोटले जाण्याची भीती आहे. विशेष म्हणजे या भागात असा प्रकार घडत असल्याच्या वृत्ताला अन्न व औषध प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.

औषध विक्रेत्यांच्या व्यवहारांवर वॉच ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने परिमंडळ १ आणि २ असे दोन दोन भाग केले आहेत. यात परिमंडळ १ मध्ये दक्षिण पश्चिम भागातील धंतोली, रामदासपेठ, धरमपेठपासून ते प्रतापनगर, मनीषनगर ते वाडी आणि परिमंडळ २ मध्ये मध्य नागपूर, उत्तर नागपूरसह ग्रामीण भाग येतो.

या दोन्ही परिमंडळात अन्न व औषध प्रशासनाने २०२४मध्ये एकूण ६१ औषधालयांचे परवाने निलंबित केले. याखेरीज प्रशासनाने चालू वर्षात २०२५ मध्ये आतापर्यंत ९५ औषधालयांवर परवाना निलंबनाचे अस्त्र उगारले. यातल्या २ औषधालयांना कायमचे टाळे लावले गेले. या कारवाया बारकाईने तपासल्या तर यातील निम्मी किरकोळ औषधालये ही उत्तर नागपूर भागातील असल्याचे आढळते. त्यातल्या त्यात यापैकी बहुतांश औषधालये कमी आर्थिक उत्पन्न गटातल्या वस्त्यांमधील आहेत.

औषधालयांच्या खरेदी-विक्रीत तफावत

झोपेच्या, गुंगी आणणाऱ्या अथवा शरीर अथवा मन बधिर करणाऱ्या औषधांची सर्रास विक्री करता येत नाही. कोणत्याही औषधालयावर जाऊन झोपेची गोळी द्या, असे म्हणता येत नाही. कारण ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकता येत नाहीत. किरकोळ दुकानातून विकली जाणारी शेड्युल एच प्रकारातली प्रत्येक गोळी, औषधांच्या बॅच क्रमांकासह ती सुचवणाऱ्या डॉक्टरचा नावासह नोंदणी क्रमांकाचा पावतीवर हिशेब ठेवावा लागतो. कायद्यानुसार याला शेड्युल्ड एच ड्रग्ज असा दर्जा आहे. मात्र, उत्तर नागपुरातल्या विशिष्ट भागातल्या किरकोळ औषधालयांनी घाऊक औषध विक्रेत्याकडून खरेदी केलेली औषधे आणि दुकानातून विकलेल्या औषधांच्या संख्येत तफावत आढळली आहे.

यातल्या काही औषधालयांनी खोकल्यासाठी वापरले जाणारे विशिष्ट कफ सिरपसह, कोडीम, केडी स्टार एक्स, अल्प्रा झोलामसह, इझेथ्रोमायसीन, हायड्रॉक्सि क्लोरोक्विन, डायझीफ्राम, ट्रिप्टोमायसीन यासारखी औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्याचे आढळले. परवाना निलंबन झालेल्या औषधालयांवर एफडीएने औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्यातल्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.

‘या’ वस्त्या रडारवर

उत्तर नागपूर संजय गांधी नगर, आदर्श नगर, खोब्रागडे नगर, पंचशील नगर, ताज नगर, बाबाबुद्ध नगर, इंदोरा बाराखोली, इंदोरा झोपडा यासह मध्य नागपूरचा भाग असलेला बाळाभाऊ पेठ, पारसेनगर, बंगाली पंजा, नाईक तलाव, भानखेडा यासारख्या झोपडपट्टी भागातली किरकोळ विक्री औषधालये अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आली आहेत.

वर्षनिहाय परवाना निलंबन कारवाई

वर्ष- एकूण औषधालये- घाऊक- किरकोळ- परवाना निलंबन
२०२४-३९००-३१३-२८६७- ६१
२०२५-४८६२-४१०-३६३२-९५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळ २ मधील विशिष्ट भागात शेड्युल (एच) औषधांची विक्री वाढल्याचे आढळले आहे. काही विशिष्ट भागात निवडक औषधांना सातत्याने मागणी का होते, हे तपासले जात आहे. त्यामुळे ज्यांचे परवाने तात्पुरते निलंबित झाले त्यांचा संपूर्ण खरेदी-विक्री व्यवहार नोंदी तपासल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल- मनीष चौधरी, सहाय्यक आयुक्त, अन् व औषध प्रशासन (औषध)