लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्रात विधान परिषद सदस्य होतो, तेव्हा एक अभियांत्रकी महाविद्यालय मिळाले होते. ते नागपुरातील अंजूमनला दिले, कारण, मुस्लीम समाजातील युवकांना शिक्षणाची सर्वांधिक गरज आहे. घरातील एक जण शिक्षित झालातर तो संपूर्ण कुटुंबाला पुढे घेऊ जात असतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नागपूरच्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या औषध निर्माण शास्त्रच्या अंतिम बॅचचा पदवीदान सोहळा शनिवारी वनामतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला यावेळी हिमाचल प्रदेशचे तंत्र शिक्षण मंत्री राजेश धर्माणी, मुंबईतील अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर काझी, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. संजीव चौधरी, माजी मंत्री अनिस अहमद उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिनीचे दूध असल्याचे म्हटले होते. शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्यांचा विकास घडून येत नाही तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास घडून येतो हे सामर्थ्य विद्वत्तेमध्ये आहे. ज्ञान ही शक्ती आहे. ज्ञानाच्या भरवश्यावर प्रगती साधली जाते. मुसलमानांनी दिवसभरात एक नाही शंभरवेळा नमाज अदा केली, पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाला आत्मसात केले नाहीतर आपला भविष्य काय असेल, असा सवाल गडकरी यांनी केला आणि व्यक्ती जाती, धर्म, पंथ, लिंग यावर मोठी होत नाही तर त्यांच्या गुणाने मोठी होते. डॉ. अब्दुल कलाम आझाद हे त्यांच्या संशोधन कार्यामु‌ळे जगभर ओळखले जातात. मुस्लिम समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.

‘नागपुरात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (औषध निर्माण उद्योग) वाढत आहे. यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. या विद्यार्थ्यांनी विद्वत्ता आत्मसात करण्यासोबतच उद्यमशीलतेची कास धरून नोकरी देणारे तसेच रोजगार निर्माते बनावे. विदर्भाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे,’ असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्यमशील बना

पदवी करणे म्हणजे ज्ञान प्राप्त करणे आहे. या ज्ञानाला उद्यमशिलतीची जोड मिळाली पाहिजे. यामुळे उद्योग उभे राहतात. त्यातून रोजगाराची निर्मिती होते. शिवाय उद्योग उभारणाऱ्याला लाभ देखील होता. अशाप्रकारे ज्ञानातून संपत्ती निर्माण होते आणि राष्ट्राचा विकास होतो. त्यामुळे पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात न राहता उद्यमशील बनण्याचा प्रयत्न करा. नोकरी मागणारे नाहीतर नोकरी देणारे बना, असा सल्लाही गडकरी यांनी पदवीधारकांना दिला.