News Flash

रंग उडणाऱ्या दोन हजारच्या नोटेविषयी पोलिसांकडे तक्रार

कागद आणि शाईच्या दर्जाबाबत साशंकता

चलनात नव्याने दाखल झालेली दोन हजार नोट घासली गेल्यास अथवा भिजल्यास फिकी पडत असल्याची तक्रार करत एका जागरूक नागरिकाने थेट पोलीस ठाण्यात दाद मागत देशहितासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ५०० आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदी आणि नवीन नोटा मिळण्यास होणारी अडचण यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असताना नव्याने मिळणाऱ्या दोन हजारच्या नोटेचा रंग वेगवेगळ्या कारणास्तव फिका पडत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात एका व्यावसायिकाने त्याची पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळून आले. या पाश्र्वभूमीवर, पोलीस ठाण्यात अर्ज देऊन संबंधिताने या प्रकरणाची चौकशी करून या संदर्भात रिझव्‍‌र्ह बँकेलाही सूचित करावे, अशी मागणी केली आहे.

मागील आठवडय़ात ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल करताना केंद्र सरकारने नवीन दोन हजार रुपयांच्या आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे जाहीर केले. जुन्या नोटा जमा करणे आणि त्या बदल्यात नवीन नोटा घेण्यासाठी नागरिकांची दमछाक होत आहे. सोमवारी बँकांना सुटी असल्याने एटीएम केंद्रांमध्ये गर्दी पहावयास मिळाली. ‘द्राविडी प्राणायाम’नंतर हाती पडणाऱ्या नव्या दोन हजार रुपयांच्या नोटेच्या रंगाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. ही नोट कपडय़ावर घासली गेल्यास अथवा भिजल्यास तिचा रंग फिका पडतो. ज्यांच्या हाती दोन हजार रुपयांची नोट पडली, त्यातील काहींकडून तिचा रंग उडत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. वास्तविक चलन निर्मिती प्रक्रियेत सुरक्षा मानकांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. बनावट चलन निर्मिती रोखण्यासाठी या मानकांचे महत्त्व असते. असे असताना या नवीन नोटांचा रंग पाणी लागल्यास लगेचच फिकट होत असल्याची बाब व्यावसायिक विलास देसले यांच्या कानी पडली. शरणपूर रस्त्यावर त्यांचे आईस्क्रिम पार्लर आहे. नेहमीच्या एका महिला ग्राहकाकडून त्यांच्याकडे दोन हजाराची नोट आली होती. या नोटेवर त्यांनी तसे प्रयोग करून पाहिले असता तिचा रंग फिका पडल्याचे निदर्शनास आले. भिजलेला हात जरी नोटेला लागला तरी तिचा रंग फिका पडतो.

ही बाब लक्षात घेऊन देसले यांनी सोमवारी सकाळी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. देशाच्या हितासाठी आणि या प्रकारात सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपण पोलीस यंत्रणेला देत असल्याचे देसले यांनी निवेदनात म्हटले आहे. आपल्याकडे असणाऱ्या नोटेचा क्रमांक आणि तिची छायाप्रत त्यांनी अर्जासोबत सादर केली.

या संदर्भात संबंधित यंत्रणांकडे पोलिसांनी माहिती द्यावी, हे चलन खरे आहे की बनावट याची शहानिशा करावी, अशी मागणी देसले यांनी केली आहे. या प्रकाराने सुटे पैसे मिळविताना त्रस्त झालेल्या नागरिकांना नवीन नोट हाती पडल्यानंतर तिचा रंग उडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी वेगळीच कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

कागद आणि शाईच्या दर्जाबाबत साशंकता

दोन हजाराच्या नोटेचा रंग फिका होणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मत भारत प्रतिभृती मुद्रणालयातील निवृत्त अधिकाऱ्यांनी आधीच व्यक्त केले आहे. या नोटेसाठी वापरलेला कागद आणि शाईच्या दर्जामुळे असे घडत असल्याची साशंकता त्यांनी व्यक्त केली. एखादी नोट कितीही दिवस पाण्यात राहिली तरी तिचा रंग जाऊ नये अशी शाई वापरली जाते. यापूर्वी चलनात असणाऱ्या कोणत्याही नोटेचा या प्रकारे रंग उडालेला नाही. नव्याने चलनात आलेल्या दोन हजारच्या नोटांचा असा रंग गेल्यास त्या वापरणे अवघड ठरणार असल्याची भीती संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी निवृत्त गुणवत्ता निरीक्षकाने केली आहे. व्यावसायिकाने उपरोक्त नोटेचा रंग फिका पडत असल्याकडे लक्ष वेधले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:09 am

Web Title: colour related issues in 2000 rupees note
Next Stories
1 विमानतळाच्या धर्तीवर मुख्य बसस्थानक
2 बँकांबाहेरील रांगांना निवडणुकीचा रंग
3 खगोलप्रेमींसाठी अभ्यासपूर्ण आठवडा
Just Now!
X