करोना काळात येथे होणारे साहित्य संमेलन नियोजित तारखेला घ्यावे, की पुढे ढकलावे, या पेचात अडकलेल्या संयोजकांची सद्यस्थिती ‘इकडे आड, तिकडे विहिर’ अशी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी यावर विचारविनिमय करूनही ठोस निर्णय झाला नाही. करोना स्थितीचा अंदाज घेऊन दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

वाढत्या करोनामुळे मार्चअखेरीस येथे होणारे ९४ वे साहित्य संमेलन पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू असल्यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकला होता. नाशिकसह राज्यातील अनेक भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचा संमेलनातील उपस्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो. बैठकीत यावर चर्चा झाली. नियोजनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले. या अनुषंगाने साहित्य महामंडळाशी चर्चा केली जाईल. सर्व घटक एक-दोन दिवसात स्थितीचा अंदाज घेऊन अंतिम निर्णयाप्रत येतील, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी सांगितले.

या संमेलनासाठी राज्य शासनाकडून मिळणारे ५० लाखाचे अनुदान आणि आमदार निधीतून मिळणारी सुमारे दीड कोटींची रक्कम आर्थिक वर्ष संपुष्टात आल्यानंतर परत जाईल, ही संयोजकांसह साहित्य महामंडळास धास्ती आहे. परंतु, निधीचा प्रश्न नसून संमेलनात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी नमूद केले. दुसरीकडे साहित्य महामंडळ नियोजित तारखेला संमेलन घेण्यावर आग्रही आहे. स्वागताध्यक्षांशी चर्चा केल्याशिवाय परस्पर कोणताही निर्णय जाहीर करू नका, असे महामंडळाने संयोजकांना कळवल्याने तूर्तास निर्णय टळला. एकदा करोना आटोक्यात येणार नाही, हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आम्हाला चार संस्थांशी आधी चर्चा करावी लागेल, असे महामंडळाचे पदाधिकारी सांगतात.