News Flash

प्रशासकीय नियोजन डळमळीत

प्राणवायू, रेमडेसिविरअभावी उपचारास मर्यादा

प्राणवायू, रेमडेसिविरअभावी उपचारास मर्यादा

नाशिक : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झाला असताना प्राणवायू, रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने उपचारास मर्यादा येत आहेत. प्राणवायूअभावी रुग्णास दाखल करावे की नाही, हा प्रश्न डॉक्टरांना भेडसावत असून दुसरीकडे रेमडेसिविरच्या वितरणासाठी जिल्हा प्रशासनाने स्थापलेल्या मध्यवर्ती केंद्राच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतले जात आहेत. आजही रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. औषधे, प्राणवायूअभावी मृतांची संख्या वाढण्याचा धोका आहे. कठोर निर्बंध लादूनही रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. रुग्णांच्या वाढत्या संख्येने सर्व नियोजन, व्यवस्था डळमळीत होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यात सध्या पाच ते सात हजाराच्या दरम्यान नवीन रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासात ४० जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या ४२ हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. यातील ११६५ रुग्ण अतिदक्षता विभागात असून २०९१ रुग्णांना प्राणवायूचा आधार द्यावा लागत आहे. जवळपास साडेसहा हजार गंभीर रुग्ण आहेत. प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी रुग्णांची वाढती संख्या पाहता कितीही औषध साठा आला तरी तो कमी पडेल, अशी साशंकता खुद्द आयएमएच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. प्राणवायूअभावी रुग्णांना दाखल करून घ्यावे की नाही ही समस्या रुग्णालयांना भेडसावते. रेमडेसिविरही रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अनेक आठवडय़ांपासून ही स्थिती आहे. प्राणवायूचे संकट उभे ठाकले आहे. प्राणवायू, रेमडेसिविरची पुरेशा प्रमाणात उपलब्धता व्हावी, अशी मागणी रुग्णालय संघटना, आयएमएच्या प्रतिनिधींनी केली. प्रशासकीय यंत्रणा व डॉक्टरांची यंत्रणा एकत्रितपणे औषधांची शिफारस, वापर तसेच वितरण या सगळ्या बाबींवर प्रभावी नियंत्रण आणतील, असा विश्वास संबंधितांनी व्यक्त केला.

रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याबरोबर पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला. हा कक्ष स्थापन होऊनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नसल्याचे आरोप होत आहेत. मागणी नोंदवूनही इंजेक्शन मिळत नाही. काही तालुक्यांना रेमडेसिविर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हाताबाहेर चाललेल्या स्थितीत प्रशासन दैनंदिन किती रेमडेसिविर वा प्राणवायूचा जिल्ह्यात पुरवठा होत आहे, त्याची आकडेवारी मात्र जाहीर करीत नसल्याकडे अनेक जण लक्ष वेधतात. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्राणवायू, रेमडेसिविरचा वापर व्हावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अवास्तव वापर टाळल्यास खऱ्या गरजू रुग्णांना ते वेळेवर उपलब्ध करता येतील. यासाठी शहर, ग्रामीण भागात २४ पथके तयार करण्यात आली आहेत. ज्या रुग्णासाठी ती घेतली गेली, तिचा त्याच रुग्णासाठी वापर झाला की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.

रेमडेसिविरचा मागणीच्या तुलनेत १० ते १५ टक्के पुरवठा

जिल्ह्यात साडेसहा हजार रुग्णांसाठी रेमडेसिविरची ३० ते ३५ हजारची गरज असून मागणीच्या तुलनेत १५ ते २० टक्के पुरवठा होत आहे. त्यामुळे हा वितरण व्यवस्थेचा, कर्मचाऱ्यांचा दोष नाही तर तो साठय़ाचा दोष आहे. या स्थितीत काहींना इंजेक्शन मिळत नाही. त्यांना ही व्यवस्था योग्य नसल्याचे वाटते. कसेही वितरण केले तरी कुणाची तरी तक्रार राहते. रुग्णसंख्येच्या प्रमाणात वितरण केले तर सर्व विभागांना मिळत नसल्याची लोकप्रतिनिधी तक्रार करतात. तालुकानिहाय वितरण केले तर गरज असणारे रुग्ण आहेत काय, हा प्रश्न निर्माण होतो. प्रशासन गरजू रुग्णांना रेमडेसिविर देण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात अधिकाधिक औषधे कसे येतील याचा प्रयत्न केला जात आहे. या व्यवस्थेसाठी २४ पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. भरारी पथके रुग्णालयात जाऊन तपासणी करतील. यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले जात आहे. योग्य रुग्णाला औषध लिहून दिले जाईल, याची डॉक्टरांनी काळजी घ्यावी. या संदर्भात आयएमए डॉक्टरांचे प्रबोधन करणार आहे. या व्यवस्थेत कोणाला सूचना असल्यास त्यांचे स्वागत आहे.

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 1:06 am

Web Title: huge shortage of oxygen and remdesivir due to outbreak of corona in nashik district zws 70
Next Stories
1 टपाल कार्यालयातील गर्दी ओसरेना
2 परराज्यांतील प्रवाशांचे करोना चाचणीविना आगमन
3 ज्येष्ठ जलतरणपटू आबासाहेब देशमुख यांचे निधन
Just Now!
X