|| अनिकेत साठे

ऑनलाइन शिक्षण आणि परीक्षा ‘पारंपरिक’च्या तुलनेत सरस; आज वर्धापन दिन

नाशिक : करोनाकाळात गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये इतकेच नव्हे तर, वर्गात प्रत्यक्षात होणाऱ्या परीक्षांवरदेखील निर्बंध आले. वैद्यकीय अभ्यासक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या प्रत्यक्षात परीक्षा झाल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षण, परीक्षा घेताना काही पारंपरिक विद्यापीठांची धांदल उडाली. तांत्रिक दोषांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. या काळात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सहा लाख विद्यार्थ्यांना आठ हजार ऑनलाइन अभ्यास वर्ग, ई पुस्तिका, ध्वनिचित्रफिती, वेब रेडिओ आदींमधून शिक्षण दिले. लाखो विद्यार्थ्यांच्या यशस्वीपणे ऑनलाइन परीक्षा घेतल्या. मुक्त शिक्षण प्रणालीचे महत्त्व नव्याने अधोरेखित केले.

मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेला १ जुलै रोजी ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात विद्यापीठाने अनेक चढउतार पाहिले. ऑनलाइन शिक्षण, परीक्षा मुक्त विद्यापीठासाठी नवीन नव्हते. घरबसल्या शिक्षणाची सुविधा विद्यापीठाने प्रारंभापासून विविध माध्यमांतून प्रत्यक्षात आणलेली आहे. करोनामुळे पारंपरिक विद्यापीठांना या शिक्षण प्रणालीकडे जाताना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागले. तसे मुक्त विद्यापीठाचे झाले नाही. उलट या काळात मुक्त विद्यापीठाने सर्व पातळीवर सरस कामगिरी करीत विश्वासार्हता प्राप्त के ल्याचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी नमूद केले. करोनाच्या संकटात टाळेबंदी व तत्सम कारणांनी २०२०-२१ शैक्षणिक वर्षात प्रवेश संख्या कमी होईल, अशी धास्ती होती. प्रवेश प्रक्रियेची सुरुवात उशिराने झाली. कमी अवधी मिळूनही सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. घरबसल्या शिक्षण अर्थात मुक्त शिक्षण प्रणालीचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले. या वर्षात आठ हजार अभ्यास वर्गातून ऑनलाइन तासिकांमधून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यात आले. डिजिटल स्वरूपात ई पुस्तके उपलब्ध करीत शुल्कात सवलत देण्यात आली. ध्वनिचित्रफिती, २४ तास कार्यरत असणारा वेब रेडिओ आदींमार्फत ज्ञानदान करण्यात आले.

गतवर्षी ऑनलाइन परीक्षा ही अनेक विद्यापीठांसाठी तारेवरची कसरत ठरली होती. मुक्त विद्यापीठाने मात्र लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वीपणे पार पाडून सर्वांचे लक्ष वेधले. विद्यापीठाला एकूण १० लाख परीक्षा घ्यायच्या होत्या. एका वेळी ३५ हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले. ‘बँड विड्थ’ प्रणाली ताण येऊन कोसळू नये म्हणून पाच तासांचा अवधी ठेवला गेला. ‘क्लाऊड सव्र्हर’चा वापर करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सुरळीत परीक्षा पार पडल्या. शासन स्तरावरून पारंपरिक विद्यापीठांना ऑनलाइन परीक्षेसाठी मुक्त विद्यापीठाचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला गेला होता. विद्यापीठाचा राज्यातील पहिला व देशातील दुसरा ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ पद्धतीचा ऑनलाइन पदवीदान सोहळा चर्चेचा विषय ठरला. या वर्षीच्या परीक्षाही ऑगस्टमध्ये ऑनलाइन होणार आहेत. मुक्त विद्यापीठाने कोकणातील रत्नागिरीसह आता गोवा, कर्नाटकच्या सीमेपर्यंत विस्तार करण्याचे निश्चित केले आहे. त्या ठिकाणी विद्यापीठाचे अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. विद्यापीठात रोजगार मेळावा घेऊन ७० हून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आल्याचे वायुनंदन यांनी सांगितले.

पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ववत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेगवेगळ्या कारणांस्तव मुक्त विद्यापीठाचे काही अभ्यासक्रम बंद केले होते. दोन वर्षांपासून बंद असणारे पदव्युत्तर मराठी, हिंदी, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र यासह एमएस्सीचेही विविध विषयांचे अभ्यासक्रम पूर्ववत होत आहेत. विज्ञान विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रथमच मुक्त विद्यापीठास परवानगी मिळाली आहे. पूर्वी नियमित महाविद्यालयात हे शिक्षण उपलब्ध होते. दैनंदिन कामकाजात जे पुढील शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांना विज्ञानातील विविध विषयांत पदव्युत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी सांगितले.