शहरात करोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने नगरपालिका प्रशासनाने गुरूवारपासून बाजारपेठेत सम-विषम तत्वानुसार दुकाने सुरू ठेवण्याचा आणि आणि करोना संबंधीत पथ्यांची कडक अमलबजावणी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेच्या पथकाने गुरूवारी सकाळी विविध भागात धडक कारवाई करून नियम  न पाळणाऱ्या दुकानदारांविरूध्द दंडात्मक आणि दुकान बंद करण्याची कारवाई केली. या कारवाईदरम्यान येथील महात्मा  गांधी रस्त्यावर पालिकेचे कारवाई पथक आणि व्यापारी यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. कारवाई अधिक कडक केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार मुंडे यांनी दिली.

मनमाडची कोरोना रूग्णसंख्या ५४० पर्यंत गेली आहे. काही दिवसात झपाटय़ाने रूग्ण वाढत आहेत. सम-विषम  पध्दतीचा बाजारपेठेत बोजवारा उडाला. विना मुखपट्टी फिरणाऱ्यांची संख्या वाढली. प्रशासनही सुस्त झाले. या एकूणच पाश्र्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली. गुरूवारपासून पालिकेने आधीपासून अमलात असणारे, परंतु मध्यतंरीच्या काळात दुर्लक्षित झालेल्या सम-विषम  तत्वानुसार दुकाने सुरू ठेवण्याच्या नियमाची काटेकोर आणि कडक अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सकाळपासून पालिकेचे पथक बाजारपेठेत दाखल झाले. त्यांनी सुचनांचे पालन न करणारे व्यापारी, व्यावसायिकांविरूध्द थेट दुकान बंद करण्याची कारवाई  सुरू केली. सम-विषम पध्दतीवर व्यापाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यातून शाब्दीक चकमक उडाली. प्रशासनाने सम-विषम पध्दत बंद करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. काही दिवसांपासून सम-विषम  तत्वाची अमलबजावणी प्रखरपणे होत नव्हती. पालिकेने कारवाईचा बडगा उगारताच गुरूवारपासून बाजारात काहीसा परिणाम  दिसून आला.

कारवाईसाठी पोलिसांची मदत घेणार

मनमाड  परिसरात करोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे सम-विषम पध्दतीसह करोना संबंधी सूचना आणि नियमांची काटेकोर अमलबजावणी पालिकेने सुरू केली आहे. आता या कारवाईत नगरपालिका पोलीस प्रशासनाची मदत घेणार आहे. गुरूवारपासून दंडात्मक  कारवाई सुरू करण्यात येत आहे. सम-विषम  तत्वाची अमलबजावणी नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढू लागली. त्यामुळे शारीरिक अंतर पथ्य पाळले जात नाही. मुखपट्टी न घालता फिरणाऱ्यांची संख्या वाढली. ही गंभीर बाब आहे. त्याविरूध्द कडक कारवाईसाठी आता पोलिसांची मदत घेण्यात येत असल्याची  माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे  यांनी दिली. नागरिकांनी नियम आणि सुचनांचे काटेकोर पालन करावे तरच रूग्णसंख्या आटोक्यात येईल. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता डीसीएचसी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले.