जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खान्देशातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी यंदापासून बी.कॉम. रिटेल मॅनेजमेंट, बी.कॉम. बीएफएसआय, बी.ए. ह्युमॅनिटीज अँड सिव्हिल सर्व्हिसेस, बी. एससी. अप्लाईड बॉयोलॉजी आणि बी.एससी. (ऑनर्स ) इलेक्ट्रॉनिक्स, या पाच अप्रेटिंसशिप एम्बेडेड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शिकतानाच कामाचा अनुभव आणि विद्यावेतन देणाऱ्या या संधीचा लाभ १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी घेऊ शकतील.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव देण्यावर भर दिला जात आहे. याच उद्देशाने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच विविध उद्योग, बँकिंग क्षेत्र, शासकीय कार्यालये तसेच इतर व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी विशेष उपक्रम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने राबविले जात आहेत.

या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना संबंधित उद्योगांमध्ये प्रशिक्षण घेता येईल आणि त्याच वेळी त्यांना विद्यावेतन देखील मिळेल. यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध उद्योग-व्यावसायिक संस्था आणि सहकारी बँक यांच्यासोबत यापूर्वीच केले सामंजस्य करार केले आहेत.

सामंजस्य करारांद्वारे विद्यार्थ्यांचा उद्योग-व्यावसायिक संस्थांशी थेट संबंध आल्याने त्यांची रोजगार क्षमतेकडे सुलभ वाटचाल होणार आहे. विद्यापीठाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना नव्या युगातील कौशल्ये प्रदान करण्यास आणि शिक्षण-उद्योग यामधील दरी कमी करण्यास निश्चितच प्रभावी ठरेल. विद्यार्थ्यांना शिकतानाच कामाचा अनुभव आणि शासनाच्या धोरणानुसार नऊ हजार रूपयांचे विद्यावेतन मिळवून देणारे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यासाठी जळगाव पिपल्स आणि जळगाव जनता सहकारी बँक, जिल्हाधिकारी कार्यालय, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, प्रोग्रेसिव्ह ग्रोसर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्स, दीपक मेडीकल्स (अमळनेर), सेक्टर स्कील्स कौन्सिलद्वारा उद्योग संस्था, नॅचरली युवर्स बॉयोटेक यांच्याशी विद्यापीठाने कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांच्या स्वाक्षरीने सामंजस्य करार देखील केले आहेत. स्थानिक विद्यार्थ्यांना अप्रेंटिस एम्बेडेड अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यानंतर शिकतानाच विद्यावेतनही मिळेल. इच्छित क्षेत्रात काम करण्याची संधीही मिळेल, अशी आशा कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी व्यक्त केली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातून केळीची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते.

ऊतिसंवर्धित रोपांची निर्मिती व केळी शेतीवर आधारित अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केल्यास शेतकरी आणि विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. याकरिता जैन उद्योग समुह संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही विद्यापीठ सल्लागार परिषद तथा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनीही दिली आहे.