महिला आणि बाल विकास विभागापुढे अनेक समस्या
चारुशीला कुलकर्णी
नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेत बेरोजगारी, मंदी यासह वेगवेगळ्या अडचणींना सर्वच जण तोंड देत असताना अनेक जण आपल्या जवळचे नातेवाईक, आई-वडिलांपासून पारखे झाले. आतापर्यंत करोना लाटेत ५९५ बालकांचे छत्र हरपले असून यापैकी २२ बालकांनी आई-वडिलांना गमावले आहे. छत्र हरपलेल्या बालकांसाठी त्यांचे नातेवाईक पुढाकार घेत नसल्याने अशा बालकांपर्यंत पोहोचण्यात महिला आणि बाल विकास विभागाला अडचणी येत आहेत.
आतापर्यंत नाशिक जिल्ह्य़ात सहा हजार लोकांचा मृत्यू झाला असून घरातील कर्ता पुरुष, महिला, ज्येष्ठ मंडळी यांना जीव गमवावा लागला. या काळात महिला आणि बाल विकास विभागाकडून ज्या बालकांनी माता-पिता किं वा दोघांपैकी एक असे गमावले आहेत त्यांची माहिती संकलित करण्यास सुरूवात के ली आहे. आतापर्यंत महिला आणि बाल विकास विभागाकडे ५९५ बालकांची नोंद झाली. यातील ४१४ बालकांपर्यंत बाल विकास विभाग पोहोचले. यापैकी २२ बालके अनाथ झाली असून त्यांनी आई आणि वडील दोघांनाही गमावले आहे. ही माहिती संकलित करतांना महिला आणि बाल विकास विभागाला अनेक अडचणी आल्या.
लोक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. बालकांचे मायेचे छत्र हरपले असले तरी त्यांचे नातेवाईक बालकांचा सांभाळ करण्यास तयार आहेत. अशा बालकांना बाल कल्याण समिती समोर सादर करतांना अडचणी आल्या. बऱ्याच पालकांना मुलांना कायमस्वरूपी ताब्यात घेतात की काय अशी शंका येत असल्यामुळे ते समितीसमोर येत नव्हते. अशा पालकांचे समुपदेशन के ल्यामुळे ते तयार झाल्याने २२ अनाथ बालकांना बाल कल्याण समिती समोर सादर करून त्यांचा बाल संगोपन योजनेतंर्गत ताबा आदेश घेण्यात आला आहे.
काही बालके लहान असल्याने त्यांचे आधारकार्ड काढण्यास अडचणी होत्या. अशा बालकांना बाल संगोपन योजनेत समाविष्ट करत प्रति महिना ११०० रुपये देण्यास सुरू करण्यात येत आहे. शालेय शुल्क बाबत काही शाळा त्यांच्या खात्याबाबत माहिती देण्यात टाळाटाळ करत आहेत. ज्या बालकांना शालेय शुल्क भरण्याची गरज आहे अशा बालकांची माहिती आयुक्तालयास सादर करण्यात येत आहे.
अनाथ बालकांना शिधापत्रिका वितरित करण्याकरता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अनाथ बालकांच्या पालकांची संपत्ती जसे घर, वाहने, सोने, बँके तील रक्कम, विमा याबाबत बालकांचे वारस नोंद करण्याकरता सांभाळकर्त्यां पालकांशी संवाद साधला जात आहे. परंतु, पालकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती परिवीक्षा अधिकारी योगीराज जाधव यांनी दिली.
वयोगटनिहाय
बालके
शून्य ते १८ वयोगटात दोन्ही पालक गमावलेले – २२
एक पालक गमावलेले शून्य ते १८ वयोगटात- ५४२
५९५ पैकी ४१४ बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल पूर्ण झालेला असून उर्वरित १८१ बालकांच्या तपासणी अहवालावर काम सुरू आहे.
एक पालकमध्ये शून्य ते १८ वयोगटातील ५४२ बालके आहेत. यामध्ये आई गमावलेले बालके ४१ तर, वडील गमावलेले ५०१ बालके आहेत.
बाल कल्याण समितीने १८५ बालकांचे बाल संगोपन आदेश दिले आहेत, तर १९ ते २३ गटात आई गमावलेले एक आणि वडील गमावलेली २१ बालके आहेत.