लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: यंदा दीपोत्सवात सोने खरेदीची लयलूट जोरात सुरू असून, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तही गुंतवणूकदारांसह सर्वसामान्यांकडून साधण्यात आला. सराफ बाजाराला रविवारी झळाळी मिळाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मीपूजनासाठी सोन्या-चांदीच्या मूर्तींसह शिक्क्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. रविवारी ४०० रुपयांची वाढ होत सोन्याचा प्रतितोळा दर ६० हजार ४०० रुपये, तर चांदी प्रतिकिलो दरात हजाराची घसरण होऊन, ती ७२ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आली होती. गतवर्षापेक्षा यंदा २५-३० टक्क्यांवर अधिक सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी सकाळपासूनच सराफ बाजारातील पेढ्यांमध्येही खरेदीसाठी गर्दी उसळली होती. पेढ्यांमध्ये लक्ष्मीच्या मूर्तींसह शिक्के खरेदी करण्यात आली. अर्ध्या ग्रॅमपासून ते १० ग्रॅमपर्यंत सोन्याच्या, तर एक ग्रॅम ते एक किलोपर्यंत चांदीच्या मूर्ती व शिक्के उपलब्ध होते. मूर्ती व शिक्क्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी होती, असे भंगाळे गोल्डचे संचालक आकाश भंगाळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-दीपोत्सवात जळगावात कोट्यवधींची उलाढाल, मोटारींसह पाच हजारांवर दुचाकींची विक्री

दरम्यान, धनत्रयोदशीला शुक्रवारी सोन्याचे दर प्रतितोळा ६१ हजार, तर चांदी प्रतिकिलो ७३ हजारांपर्यंत होती. शनिवारी सोने प्रतितोळ्याला तब्बल हजार रुपयांनी घसरण होऊन ६० हजारांपर्यंत खाली आले होते. चांदीच्या दरात मात्र ५०० रुपयांची वाढ होऊन, ती ७३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचली होती.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने २२ कॅरेटचा दर ६० हजार ४०० रुपये आणि २४ कॅरेटचा ५५ हजार ३०० रुपये होता. चांदी प्रतिकिलो ७२ हजार ५०० रुपयांपर्यंत होती. तीन-चार दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. शनिवारी सोने प्रतितोळा दर ६० हजार रुपये होते. त्यात रविवारी ४०० रुपयांची वाढ होऊन ते ६० हजार ४०० रुपये प्रतितोळा झाले. चांदी मात्र हजाराची घसरण होऊन ७२ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आली.

आणखी वाचा-मध्य रेल्वेत तिकिटांचा काळाबाजार; सहा महिन्यात २६९ गुन्हे, ३१७ जणांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतवर्षापेक्षा यंदा दीपोत्सवात गुंतवणूकदारांसह नोकरदार व सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद लाभल्याने सुवर्णनगरीला झळाळी मिळाली. गतवर्षी सोन्याचे दर ५० हजारांच्या आसपास होते. यंदा ६० हजारांवर असतानाही खरेदीत वाढ झाली. आगामी काळात लग्नसराईला सुरुवात होत आहे. त्यामुळे दीपोत्सवाच्या मुहूर्तावर अनेकांनी दागिन्यांची खरेदीस प्राधान्य दिले. त्यामुळे मंगळसूत्र, अंगठी यांसह सर्वच प्रकारच्या दागिन्यांना ग्राहकांकडून पसंती देण्यात आली, असे सराफा व्यावसायिक कपिल खोंडे यांनी सांगितले.