सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. या दिवशी पहाटे पाचपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्याने सेलिब्रेशनचा मूड टिपण्यासाठी व्यावसायिकांनी पावले उचलली आहेत. थिरकायला लावेल अशी डान्स फ्लोअरची रचना, संगीत मैफल, संगीताच्या तालावर बेधुंद होत ‘वाइन संगे रात्र रंगे’ म्हणत ग्राहकांना आकर्षित करण्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी विविध खाद्य पदार्थाची रेलचेल राहणार आहे. एकूणच नव्या वर्षांच्या स्वागताची शहरात सध्या जोरशोरसे तयारी झाली आहे. यंदाच्या नववर्षांवर दुष्काळाचे सावट असले तरी ‘थर्टी फस्र्ट’चा मूड कायम असल्याचे लक्षात येते.

नववर्षांच्या स्वागतासाठी शहर परिसरातील विविध संस्था, हॉटेल, रिसॉर्ट, वाइनरीज् आणि गार्डन रेस्टॉरंन्ट सज्ज झाली आहेत. युवा वर्गात नववर्षांबद्दल असणारी ओढ लक्षात घेता त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळते. काही हॉटेलमध्ये तरुणाईला थिरकवणारी खास डीजेची व्यवस्था करण्यात आली आहे. कुटुंबालाही या माहोलमध्ये सहभागी होता यावे, यासाठी जोडप्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या निमित्ताने संगीताच्या तालावर फटाक्यांची आकर्षक आतीशबाजी करण्यात येणार असून ग्राहकांसाठी काही व्यावसायिकांनी सोडत पद्धतीने ‘फ्री हॉलीडे’ पॅकेज जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांत सेलिब्रेशनमध्ये मद्य प्राशनाला महत्त्व आल्याने शासनाने मद्य विक्री दुकानांना वेळ वाढवून दिली. हॉटेल पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार असल्याने मद्यप्रेमींची चंगळ आहे. खवय्यांसाठी पाश्चात्त्य संस्कृतीतील चविष्ट पदार्थासह अस्सल मराठमोळ्या चुलीवर स्वयंपाकापर्यंत असे बेत हॉटेल व्यावसायिकांकडून सादर करण्यात आले आहेत. नाताळाची सुटी पाहता काहींनी सहकुटुंब जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वरसह भंडारदरा, गंगापूर व वैतरणा आदी ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, नववर्षांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिनाअखेरीस खिशावर पडणारा भार आणि थंडीची कमी झालेली तीव्रता पाहता काही मंडळींनी हा दिवस घरीच साजरा करण्याचे ठरविले आहे. वसाहतीतील सदस्यांनी एकत्र येत ठरावीक वर्गणी गोळा करत त्या बजेटमध्ये मिष्टान्नासह काय देता येईल याचे नियोजन केले आहे.

सध्या महाविद्यालयात डेज्चा माहोल असल्याने तरुणाई मात्र यातून काहीसी अलिप्त राहत सायंकाळी पांडवलेणी, सोमेश्वर यासह काही ठिकाणी मित्रमंडळी सोबत फेरफटका मारण्याच्या तयारीत आहे. काहींनी दूरचित्रवाणीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहत घरातच हा दिवस साजरा करण्याला पसंती दिली आहे. काही सामाजिक संस्थांनी मात्र या सेलिब्रेशनवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दरम्यान, जिल्हा नशाबंदी मंचच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नवीन वर्षांचे स्वागत व्यसनमुक्ती विषयक अभिनव कार्यक्रमाने करण्यात येणार आहे. या वेळी व्यसनांविरोधात पथनाटय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षांचे स्वागत दूध पिऊन करण्याचे आवाहन मंचने केले आहे. थर्टी फस्टचे औचित्य साधून व्यसनांविरोधात जनजागृतीसाठी गोल्फ क्लब मैदानावर रंजय बच्चन त्रिवेदी हे तीन वर्षांपासून कित्येक तास पायी चालण्याचा उपक्रम करीत आहेत. या वर्षी एक हजार फेऱ्या मारण्याचे त्यांचे नियोजन आहे. २०१२ मध्ये गोल्फ क्लबवर ते १२ तास, तर २०१३ मध्ये २४ तास, २०१४ मध्ये १०० तास चालले होते. त्रिवेदी हे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता गोल्फ क्लबवर फेरी मारण्यास सुरुवात करणार आहेत. थर्टीफर्स्टचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची तयारी विश्वास बँक, जहागिरदार बेकर्स, ड्रामास्टिक लगून रिसोर्ट यांनी केली आहे. संबंधितांतर्फे ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संकल्प आनंदाचा या मराठी गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या कविता, गाणी, गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.