नाशिक : शहरात बेकायदा सावकारीचा व्यवसाय पुन्हा फोफावल्याचे चित्र असून संबंधितांच्या जाचाला कंटाळून एका ३९ वर्षीय कामगाराने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत्यूपूर्वी संबंधिताने लिहिलेल्या चिठ्ठीतून ही धक्कादायक बाब समोर आली.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि सावकारी विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली. या बाबत अनिल परदेशी (ध्रुवनगर, शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली. या घटनेत राजेंद्र परदेशी (३९, शारदा अपार्टमेंट, ध्रुवनगर) यांंनी सावकारांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली. शामराव पाटील (५३, फ्रावशी महाविद्यालयामागे, दुगांव, नाशिक) व मोहन खोडे (४५, अथर्व रेसिेेडेन्सी, शिवाजी नगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून मोहन खोडे (लखमापूर, बागलाण) हा सावकार अद्याप फरार आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातील कामगार राजेंद्र परदेशी हे गेल्या चार वर्षांपासून आर्थिक अडचणीत होते. त्यांनी संशयित शामराव पाटील याच्याकडून तब्बल चार लाख ७० हजार रुपये दरमहा सहा टक्के व्याजदराने, तर नंदु बच्छाव (लखमापूर) याच्याकडून तीन लाख रुपये दरमहा चार टक्के व्याजदराने घेतले होते. मात्र, घेतलेल्या कर्जापेक्षा व्याज अधिक झाले.
संशयित शामराव पाटील, त्याचा साथीदार मोहन खोडे आणि नंदू बच्छाव हे तिघेही पैशांचा तगादा लावत राजेंद्र परदेशी यांच्यामागे हात धुवून लागले होते. सततचा तगादा, अपमान आणि धमकीमुळे परदेशी खचून गेले होते. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी अखेर मृत्यूला कवटाळले. आत्महत्या करण्यापूर्वी परदेशी यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यात संशयितांच्या जाचास कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केल्याने या घटनेस वाचा फुटली.
या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व बेकायदा सावकारी विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची दखल घेत दोघांना अटक केली असून त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत.
या घटनेमुळे शहरातील बेकायदा सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील काही वर्षात खासगी सावकारांच्या जाचाला वैतागून सहा ते सात जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरात खासगी सावकाराला वैतागून दाम्पत्याने आत्महत्या केली होती. सातपूर येथेही फळविक्रेता पिता-पुत्राला आत्महत्या करावी लागली. मध्यंतरी खासगी सावकार वैभव देवरेपाठोपाठ व्याजाने पैसे देत भरमसाठ वसुली करणारा भाजपचा माजी पदाधिकारी रोहित कुंडलवाल यांचे उद्योग समोर आले होते.या घटनानंतर सहकार व पोलीस यंत्रणेने अवैध खासगी सावकारांविरोधात कारवाईची मोहीम राबविली. कारवाईचा बडगा उगारला गेला. तथापि, बेकायदा सावकारी व्यवसायावर निर्बंध आले नसल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले.