नाशिक विभागात करोनाचे ९२२ रुग्ण

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : करोनाची लक्षणे नसणारे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आता केवळ १० दिवसच रुग्णालयात रहावे लागणार आहे. नाशिक विभागात सध्या उपचार घेणाऱ्या ७६१ पैकी ४०० रुग्ण त्याच श्रेणीतील आहेत. नव्या निकषानुसार विभागातील रुग्णालयांतून सुमारे ४०० जणांना विहित मुदत पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने घरी सोडले जाईल. व्हेंटिलेटर आणि प्राणवायू यंत्रणेची गरज भासणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अतिशय कमी आहे. सौम्य लक्षणे असणारे आणि लक्षणे नसणाऱ्यांना लवकर सोडले जाणार असल्याने शासकीय रुग्णालयांतील खाटा रिकाम्या होतील. शिवाय आरोग्य यंत्रणेवरील ताणही काही अंशी कमी होणार आहे.

विभागात करोनाचे आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६३२, जळगावमध्ये १६३, धुळे आणि अहमदनगर प्रत्येकी ५३ तर नंदुरबारमध्ये २१ असे एकूण ९२२ बाधित रुग्ण आहेत. यातील ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअंती करोनामुक्त झालेल्या ११० रुग्णांना घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात ५६६, जळगाव १४०, नगर १५, धुळे ३०, नंदुरबारमध्ये १० असे एकूण ७६१ रुग्ण उपचार घेत आहेत. यात व्हेंटिलेटरवर घेण्याची गरज बोटावर मोजता येईल इतक्याच रुग्णांना लागली. तर प्राणवायू पुरविणारी यंत्रणा अतिशय मोजक्याच जणांना काही काळ द्यावी लागली. म्हणजे गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. उपचार घेणाऱ्या बहुतांश म्हणजे ७० ते ८० टक्के जणांमध्ये एकतर लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. अशा रुग्णांची संख्या साधारणत: ४०० इतकी आहे. आधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार करोनाबाधितास १४ दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेऊन उपचार केले जातात. हा कालावधी झाल्यानंतर पुन्हा चाचणी केली जाते. ती नकारात्मक आल्यानंतर संबंधित रुग्णास रुग्णालयातून घरी सोडले जाते. आता या मार्गदर्शक तत्वात लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे असणाऱ्या करोनाबाधितांसाठी बदल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त राजाराम माने आणि आरोग्य उपसंचालक एम. आर. पटणशेट्टी यांनी दिली.

रुग्णालयातून रुग्णास घरी सोडण्याच्या सुधारित धोरणानुसार अशा रुग्णांना १४ ऐवजी १० दिवस रुग्णालयात ठेवले जाईल. रुग्णाला लक्षणे सुरू झाल्यापासून सातव्या, आठव्या, नवव्या दिवशी ताप नसल्यास १० व्या दिवशी तपासणी करून घरी सोडले जाईल. पुन्हा त्याची करोना चाचणी केली जाणार नाही. घरी गेल्यानंतर रुग्णास सात दिवस विलगीकरण करावे लागणार आहे. तसे शिक्के संबंधितांच्या हातावर मारले जाणार आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय रुग्णालयांवर कमालीचा ताण आला आहे. सौम्य लक्षणे आणि लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना चार दिवस आधी सोडले जाणार असल्याने आरोग्य यंत्रणेवरील हा ताण काहीअंशी कमी होईल. करोना रुग्णालयातील खाटा मोठय़ा संख्येने मोकळ्या होतील. याचा उपयोग गंभीर आणि अतिगंभीर श्रेणीतील रुग्णांवर उपचारावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

व्हेंटिलेटरची गरज भासणारे नाशिक, मालेगावमध्ये प्रत्येकी चार असे एकूण आठ रुग्ण आहेत. प्राणवायू यंत्रणेची अधूनमधून गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या देखील फारशी नाही. म्हणजे करोनाच्या अतिगंभीर आणि गंभीर गटातील विभागात १५ ते २० टक्के आहेत. उर्वरित ८० टक्के रुग्ण सौम्य अथवा लक्षणे नसणाऱ्या गटातील आहेत. त्यांना उपरोक्त उपकरणे, व्यवस्थेची गरज भासत नाही. नव्या निकषानुसार अशा सुमारे ४०० जणांना रुग्णालयातील विहित मुदत पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून घरी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

– एम. आर. पटणशेट्टी (आरोग्य उपसंचालक, नाशिक विभाग)

नाशिकमध्ये १४ नवे रुग्ण

रविवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात १४ नवीन रुग्ण आढळले. सायंकाळपर्यंत एकूण १२३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १४ जणांचे अहवाल सकारात्मक, तर उर्वरित नकारात्मक आहेत. प्राप्त अहवालात तीन आधीच्या बाधित रुग्णांच्या अहवालाचा समावेश आहे. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये येवल्यातील सहा, दिंडोरीतील तीन, मालेगाव, सटाण्यातील ताहाराबाद, नाशिक शहर आणि सिन्नरच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ६४६ वर पोहचली आहे.