येथील प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी केल्यावरही जवळपास पाच हजार चालकांना वाहन परवाने वितरित होऊ शकलेले नाहीत. परवाना नसल्याने अनेकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत असून नाहक दंड भरावा लागत आहे. दुसरीकडे, परवाने तयार करण्याचे काम १० मार्चपासून बंद असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

१० मार्चपासून वाहन परवाना वाटप करण्याचे काम ठप्प असल्याने पाच ते सहा हजार वाहन परवाने वितरीत होऊ शकलेले नाहीत.

हेही वाचा >>> मालेगाव: कजवाड्यात वादळी वाऱ्यामुळे पॉलीहाउस, शाळा, घरांची पडझड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रादेशिक परिवहन विभागाने हे परवाने बनविण्याचे काम एका संस्थेला दिले आहे. या संस्थेशी परवाने बनविण्याचा करार झाला असून हा करार संपला असल्याची माहिती संबंधितांना देण्यात येत आहे. वाहन धारकांनी ऑनलाईन नोंदणी करुन आवश्यक ते शुल्क भरल्यावर आणि वाहन चालविण्याची चाचणी दिल्यावर वाहन परवाना मंजूर करण्यात येतो. यानंतर टपालाव्दारे परवाने घरपोच दिले जातात. यासाठी टपाल शुल्कही वसूल केले जाते. वाहन चालकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर वाहन परवाना मिळालेला असला तरी मूळ प्रत उपलब्ध झालेली नाही. पोलिसांकडून वाहन चालकांकडून परवान्याच्या मूळ प्रतीची मागणी केली जाते. ती न दाखविल्यास दंड आकारण्यात येत आहे. दरम्यान, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे यांनी वाहन परवाना बनवून देण्याचे काम १० मार्चपासून बंद असून या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले. काम बंद असल्याने निरनिराळ्या वाहनांसाठीचे सुमारे पाच हजार वाहन परवाने वितरित होऊ शकलेले नसल्याचे त्यांनी नमूद केले.