जळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना जून महिन्यात घडली होती. माऊलीनगर परिसरातही पाच वर्षाच्या मुलास मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, त्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
समतानगर नागेश्वर कॉलनी भागात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय अरविंद गायकवाड या मुलाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भटके कुत्रे आणून सोडणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या विरोधात त्यावेळी तीव्र संताप व्यक्त केला होता. तसेच चार वर्षीय बालकाच्या मृत्युची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी, अशी मागणी करून भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला होता. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरातील विविध भागात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष यापूर्वी अनेक वेळा गंभीर जखमी झाले आहेत. कुत्रे चावण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
रस्त्यावरील मोकाट कुत्रे वाहनाच्या मागे लागल्याने देखील अनेक अपघात यापूर्वी घडले आहेत. महापालिकेने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तरीही शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या आणि हल्ले कमी झालेले नाहीत. धक्कादायक प्रकार म्हणजे महापालिकेचे पथक पकडलेले मोकाट कुत्रे शहराचाच एक भाग असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये तसेच लगतच्या गावांमध्ये सोडून देतात. परिणामी, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कधीच कमी होत नाही. ही बाब नागरिकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. प्रत्यक्षात त्यानंतर महापालिकेने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी युद्ध पातळीवर कार्यवाही केली. घाईगर्दीत यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संस्थेला पुन्हा निर्बिजीकरणाची जबाबदारी सोपवली. आता उशिरा का होईना कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम एका संस्थेला अधिकृतपणे देण्यात आले आहे. मात्र, त्यात म्हणावी तशी गती दिसून आलेली नाही.
परिणामी, जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अजुनही कमी झाल्याचे दिसून आलेले नाही. माऊली नगरातील रवींद्र पाटील यांचा पाच वर्षीय मुलगा समर्थ हा मंगळवारी दुपारी बारा वाजता शाळेतून आल्यानंतर घरासमोरील अंगणात खेळत होता. त्याच वेळी अचानक एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला जीवघेणा केला. कुत्र्याने समर्थच्या मानेचा लचका तोडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच रवींद्र पाटील आणि त्यांची पत्नी दिपाली पाटील यांनी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील समर्थला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.