जळगाव – बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांना लुटल्याची घटना अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारात असलेल्या पांडुरंग पेट्रोलपंपावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर सव्वाबाराच्या सुमारास घडली. ही सर्व घटना पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. याबाबत दोन अनोळखी लुटारूंविरुद्ध अमळनेर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर सव्वाबाराच्या सुमारास एकजण आला. त्याने बंदुकीचा धाक दाखवून सुमारे ३६ हजार ५०० रुपये लुटले. पेट्रोलपंपावर कर्मचारी किशोर पाटील आणि नरेंद्र पवार हे होते. यावेळी काळ्या रंगाच्या रुमाल बांधलेला अनोळखी व्यक्ती आला. त्याने कर्मचार्‍यांना झोपेतून उठविले. त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले. याच वेळी मोटारीत डिझेल भरण्यासाठी एकजण पंपावर आला. लुटारूने त्याच्या मोटारीच्या डिक्कीला लाथा मारत चालकास बाहेर येण्यास भाग पाडले. त्यालाही बंदुकीचा धाक दाखवीत मारहाण केली. त्याच्याजवळील पाकीटही हिसकाविले. रस्त्यावर त्याचा साथीदार दुचाकीसह उभा होता. ते दोघेही दुचाकीवरून धुळ्याकडे पसार झाले.

अमळनेर तालुक्यातील पेट्रोलपंपावर लुटीचा थरार (video – loksatta team)

हेही वाचा – नाशिक: जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ – एकाच दिवसात १८ जण संक्रमित

हेही वाचा – जळगाव: राज्यभरात ७ हजार ८९१ चिमण्यांची नोंद; निसर्गमित्र संस्थेच्या ऑनलाइन गणना मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंपावरील कर्मचारी नरेंद्र पवारकडून १३ हजार २०० रुपये, किशोर पाटील याच्याकडून १४ हजार ३०० आणि मोटारमध्ये डिझेल टाकण्यासाठी आलेले संजय भामरे यांच्याकडून नऊ हजार रुपये, असा सुमारे ३६ हजार ५०० रुपये या दोन्ही लुटारूंनी बंदुकीचा धाक दाखवून लांबविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेत माहिती घेतली. याबाबत कर्मचारी नरेंद्र पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर येथील पोलीस ठाण्यात अज्ञात दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक विकास शिरोळे तपास करीत आहेत.