नाशिक : त्र्यंबकहून नाशिककडे येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने दुभाजकाला आदळत बस दुसऱ्या मार्गिकेत जाऊन दोन दुचाकींना धडकली. नंतर झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दोन जण जखमी आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील बेळगावढगा परिसरात हा अपघात झाला.
प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस त्र्यंबकेश्वरहून देवदर्शन करून शनिवारी नाशिककडे निघाली होती. बस बेळगाव ढगा फाट्या जवळ आली असता अचानक टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर आदळून दुसऱ्या मार्गिकेत गेली. नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना बसची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार ओम तासकर (२९, रा. दिंडोरी) याचा मृत्यू झाला. त्याच्याबरोबर असलेली विद्यार्थिनी आकांक्षा जाधव ही जखमी आहे. सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.