शहर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वजण हैराण झाल्याने चहुबाजूने त्याविषयी ओरड सुरु झाल्यावर उशिराने का होईना पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार मंगळवारी रात्री शहरात ठिकठिकाणी तपासणी (कोम्बिंग ऑपरेशन) करण्यात येऊन सराईतांसह समाजात दहशत निर्माण करणाऱ्या शंभरपेक्षा अधिक जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी पहाटे दोनपर्यंत सुरू होती. पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द यापेक्षा अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा >>>यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर

शहर परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागल्याने पोलिसांविषयी सर्वत्र नाराजीचा सूर उमटू लागल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी रात्री उशीरा उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार तपासणी मोहीम सुरु करण्यात आली. यामध्ये सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत नोंद असलेले तसेच पाहिजे असलेले, टवाळखोर, तडीपार केलेले अशा सर्व गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. या कारवाईत ९० गुन्हेगार मिळून आले. तसेच शहरातून हद्दपार केलेल्या ३६ गुन्हेगारांचीही तपासणी करण्यात आली. परंतु, एकही मिळाला नाही. २९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. तसेच भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकाविरूध्द अंबड पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कारवाईत आयुक्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस उपायुक्त, चार सहायक आयुक्त, सर्व पोलीस ठाणे प्रभारी तसेच पोलीस ठाण्यांकडील ४२ अधिकारी, २३६ अंमलदार, गुन्हे शाखा विभाग एक आणि दोनचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.