जळगाव : शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध असताना प्रत्येक विद्यार्थ्याने एक माणूस म्हणून त्यात अव्वल असलेच पाहिजे. केवळ स्त्री आणि पुरूष या द्वंदामध्ये न अडकता प्रत्येकाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असावे. युवा महोत्सवातून मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी येथे केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. या प्रसंगी अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय फुलारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कारभारी काळे, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, राजभवनद्वारा नियुक्त निरीक्षण समितीचे डॉ. संदीप हाडोळे, वित्त समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास अंभुरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नितीन झाल्टे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. महेंद्रसिंग रघुवंशी, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. एस. एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील, प्रा. सुरेखा पालवे, राजभवन निरीक्षण समिती सदस्य डॉ. विजय कुंभार, डॉ. राजेंद्र माळी, वित्त समिती सदस्य डॉ. राजीव कटारे, डॉ. धनाजी जाधव, डॉ. राजेश लिमसे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, युवक महोत्सवाचे माजी कार्याध्यक्ष दिलीप पाटील, आयोजन समितीचे सचिव डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, युवक महोत्सवामधूनच ऊर्जा मिळत असल्याचे सांगत आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना अभिमान वाटेल, असे आयुष्य जगण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे. आपण आपले ध्येय ठरवले तर प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो, असेही श्रेया बुगडे यांनी स्पष्ट केले. आजच्या डिजीटल युगात विद्यार्थ्यांना हव्या त्या क्षेत्रात करीअर करता येईल, परंतु तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा त्यात अव्वल राहा. मी कोण आहे याचा शोध मी केव्हाच थांबवला आहे. माझे लक्षात आले आहे की सृष्टीने निर्माण केलेले सुंदर फुल नाही तर मीच आहे. संपूर्ण सृष्टी मीच आहे. आभाळ मीच आहे, असेही अभिनेत्री बुगडे म्हणाल्या. कृष्णकांत ही चारोळी सादर करून ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि सई ताम्हणकर यांची नक्कल देखील श्रेया बुगडे यांनी केली.

२४ विद्यापीठाच्या संघांनी महोत्सवात सहभाग नोंदविला. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर शोभायात्रा आल्यानंतर ‍सहभागी संघानी विविध लोककला आणि परंपरेचे सादरीकरण केले. वंदे मातरम, जय जय महाराष्ट्र, देशभक्तीपर गीते, भारूड, आदिवासी नृत्य व संस्कृती, विकसित भारत, गारद, खान्देशातील लोकसंस्कृती, गोंधळ, पर्यावरण, मतदान जनजागृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, विदर्भातील थोर रत्ने, कोकणातील दशावतार, जत्रा संस्कृती, वारकरी संस्कृती, नारी शक्ती, आरोग्य जनजागृती, राष्ट्रीय एकत्मता, संस्कृत प्रसार, ढोल ताशा, लेझीम असे विविध विषयांवर कलांचे आविष्कार सादर करण्यात आले.