नाशिक : शहराच्या प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक व दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी कटिबद्ध असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे ‘एअरोनॉमिक्स २०२५’ या नावीन्यपूर्ण मोहिमेस एक ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता हॉटेल प्लामस्प्रिंग येथे मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहर प्रदुषणमुक्त, पर्यावरणपूरक राहण्यासाठी या अभिनव मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास मंत्री छगन भुजबळ यांच्यासह देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, सत्यजित तांबे हे आमदार, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम ,महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे हे उपस्थित राहतील. मोहिमेची रूपरेषा क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी मांडली. ‘एअरोनॉमिक्स २०२५’ ही केवळ पर्यावरण रक्षणाची नव्हे, तर नाशिकच्या सामाजिक आणि आर्थिक उत्कर्षाची चळवळ आहे. या उपक्रमामुळे हवेचा दर्जा सुधारणा, स्वच्छ इंधनावर आधारित वाहतूक, औद्योगिक प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवणे , कचरा व्यवस्थापन आदींवर काम होणार असल्याचे सांगितले. क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष तथा मोहिमेचे समन्वयक उदय घुगे यांनी, २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, या मोहिमेच्या माध्यमातून पर्यटकांना अधिक चांगले शहर अनुभवायला मिळेल आणि त्याचा थेट परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर होईल, असा दावा केला.
मानद सचिव तुषार संकलेचा यांनी, ‘एअरोनॉमिक्स २०२५’ सारख्या उपक्रमांमधून बांधकाम व्यावसायिकांचा समाजाप्रती असलेला जाणीवपूर्वक सहभाग व्यक्त होतो. नाशिकच्या शाश्वत विकासासाठी सर्व सामाजिक संस्था, उद्योगसमूह आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही मोहीम जनआंदोलनात रूपांतरित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सहभागी संस्था
या मोहिमेत नाशिक सिटीजन फोरम, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, नाईस, निमा, आयमा, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, नरेडको, असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, आर्किटेक्ट ॲण्ड इंजिनियरिंग असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक, नाशिक आयटी असोसिएशन, लघुउद्योग भारती, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, फायर सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया आदींचा सहभाग आहे.