नाशिक : ग्रामस्थांनी चेहऱ्याला ओले फडके वा मुखपट्टी वापरावी. संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने करण्यात येत आहे. जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पातील धुराच्या लोटाने आरोग्यास काही अपाय होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने अशा प्रकारे मुंढेगावच्या १० किलोमीटरच्या परिघातील गावांमध्ये दवंडीद्वारे दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात रविवारी सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली. रासायनिक पदार्थांमुळे ती अधिक भडकली. जवळपास २४ तास ती धुमसत राहिली. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. दुसऱ्या दिवशी आगीवर काहीअंशी नियंत्रण मिळवले गेले असले, तरी धूर अद्याप कायम आहे. धुरामुळे आसपासच्या रहिवाशांना आरोग्याच्या (ॲलर्जी) काही समस्या उद्भवू शकतात. हे लक्षात घेत प्रशासनाने १० किलोमीटरच्या परिघात दवंडीद्वारे खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – Jindal fire accident : आगीच्या कारणांचा शोध सुरू, चौकशीअंती गुन्हा दाखल होणार

कारखान्यातील आगीमुळे आसपासच्या भागात धुराचे प्रमाण वाढले. त्यामुळे विषारी वायूचे प्रदूषण झालेले नाही. मात्र, काहींना धुराचाही त्रास होतो, हे लक्षात घेऊन दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आल्याचे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी सांगितले.

कारखान्याच्या १० किलोमीटरच्या परिघातील गावांमध्ये दवंडीद्वारे माहिती दिली गेली. एक, दोन दिवस कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कामासाठी बाहेर पडताना चेहऱ्याला ओले फडके, मुखपट्टी वापरल्यास धुरापासून बचाव करता येईल. तसेच संपूर्ण अंग झाकले जाईल, अशा प्रकारच्या कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन दवंडीद्वारे केले जात आहे.

हेही वाचा – पोलिसात भरती होण्याची जिद्द, पण अडचणीही अधिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारच्या दुर्घटनेनंतर आसपासच्या गावातील अनेकांनी आगीचा रौद्रावतार बघण्यासाठी प्रकल्पाच्या आसपास गर्दी केली होती. प्रशासनाच्या खबरदारीच्या आवाहनामुळे संंबंधितांना एक प्रकारे चाप लागणार आहे.