नाशिक – जिल्ह्यात राष्ट्रवादीचे (अजित पवार) सात आमदार आहेत. धोरणानुसार ज्यांचे आमदार जास्त, त्या पक्षाला त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळायला हवे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी याआधीही आमची मागणी होती, आजही आहे आणि उद्याही राहील, अशी भूमिका कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी मांडली.

मित्र पक्षांतील असंतोष उफाळून आल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री म्हणून जाहीर झालेले भाजपचे गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला चोवीस तासांच्या आत स्थगिती दिली गेली. या पदासाठी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री दादा भुसे हे इच्छुक होते. त्यांचे नाव पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळले गेले. तर याच पदासाठी इच्छुक राष्ट्रवादीचे ॲड. माणिक कोकाटे यांच्यावर नंदुरबारच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली गेली. पालकमंत्रीपदावरून महायुतीत मतभेद उफाळून आले असताना सोमवारी राष्ट्रवादीचे मंत्री ॲड. कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुंभमेळ्यात स्थानिक पालकमंत्री महत्वाचा असल्याकडे लक्ष वेधले. स्थानिक व्यक्तीचा आवाका मोठा असतो. प्रश्नांची जाण असते. ते सोडविण्यासाठी तो अधिक वेळ देऊ शकतो. इतर जिल्ह्याची जबाबदारी दिल्यास केवळ पाटी टाकायला जाण्यासारखे होते, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – नाशिक : फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहीम

हेही वाचा – नाशिक : अभाविपचे आरोग्य विद्यापीठात आंदोलन, शिक्षण मंत्र्यांसह कुलगुरुंकडून दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे गटाने नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा सांगण्यात काही गैर नाही. दावा कोणीही करू शकते. दावा करणे, अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले. आठ दिवस आपण राज्याच्या दौऱ्यावर होतो. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी जाणून घेत होतो. त्यामुळे पालकमंत्री नियुक्तीबाबत कुठलेही मत व्यक्त केले नाही. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. आपण मागणी केलेली नाही. पक्ष निर्णय घेईल, तो मान्य असेल. असे कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार शहरात रविवारी किरकोळ अपघातामुळे झालेल्या तणावाचा फायदा घेत एका गटातील काहींनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या संदर्भात माहिती घेतली जाईल, असे नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी नमूद केले.