जळगाव – जिल्ह्यात राष्ट्रवादीला (शरद पवार) अलीकडे मोठी गळती लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र, गुजराथी यांनी आपण कुठेही जात नसल्याचे स्पष्टीकरण देत थेट राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. अशा स्थितीत अजित पवार गटाकडून आता त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत होऊन गेलेल्या काही मुरब्बी राजकारण्यांत अरूण गुजराथी यांचीही गणना होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीपासून शरद पवार यांना दिलेली साथ आजतागायत कायम राहिली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही ते पवार यांच्या बरोबर खंबीरपणे उभे होते. पक्षाच्या जळगावसह खान्देशातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गरज पडली तेव्हा त्यांनी वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शनही केले. वैयक्तिक पवार यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत असताना गुजराथी यांनी त्यांच्यावरील आरोपांचे आपल्या स्तरावर खंडन करण्याची भूमिका घेतली. असे असताना, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी जळगावात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीला ते मुद्दाम अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. एरवी नेहमी व्यासपीठावरील पहिल्या रांगेत बसणारे गुजराथी असे अचानक पक्षाच्या बैठकीपासून लांब राहिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे आणि अरूण पाटील यांच्यानंतर अरूण गुजराथी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देतील, असे बोलले गेले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही त्यास अप्रत्यक्ष दुजोरा देत जाणाऱ्यांना जाऊ द्या म्हटले होते. परंतु, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आजपर्यंत आपल्याला भरपूर काही दिले. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा अन्य दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्न येत नाही. आता मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात गेले तरी मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहील, असे स्पष्ट करून गुजराथी यांनी त्यांच्या शरद पवार गट सोडून जाण्याच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस गेल्या काही महिन्यात धुळे दौऱ्यावर आले असता, गुजराथी हे तिथे आवर्जून उपस्थित राहिले. इतकेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करून दोन शब्द हितगूज केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले. गुजराथी आता भाजपमध्ये जातात की काय, अशी नवी चर्चा सुरू झाली. तशात गुरूवारी चोपड्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेले अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी थेट गुजराथी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. वैयक्तिक गुजराथी यांनी मात्र दोघांची भेट राजकीय नसल्याचा दावा केला आहे.
अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आमच्या निवासस्थानी केवळ सदिच्छा भेट दिली. या वेळी कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. त्यांचे काका बाळासाहेब जाधव माझे चांगले मित्र होते.-अरूण गुजराथी (ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)