जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) वर्चस्व असलेली जिल्हा सहकारी बँक सुस्थितीत असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी तारण ठेवलेल्या आणि स्वमालकीच्या जुन्या मालमत्ता विकण्याचा धडाका आता संचालक मंडळाने लावला आहे. एकनाथ खडसे यांच्यासारख्या विरोधी पक्षातील ज्येष्ठ संचालकांनी जिल्हा बँकेच्या निर्णयाला कडाडून विरोध सुद्धा केला आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे असून, प्रमुख संचालकांत आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह महायुतीचे घटक पक्ष भाजपचे मंत्री संजय सावकारे, शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील, किशोर पाटील आदी बऱ्याच तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विरोधात राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, प्रदेश सरचिटणीस ॲड.रवींद्र पाटील आदी बोटावर मोजण्याइतके संचालक तेवढे आहेत. असे असताना, विद्यमान संचालक मंडळाने अलिकडे काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये दगडी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठेतील शाखेच्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या विक्रीचाही समावेश आहे.
यापूर्वीही, फैजपूर (ता. यावल) येथील मधुकर सहकारी कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेच्या ताब्यात असताना सुमारे ६३ कोटी रुपयांनी विक्री झाला होता. मधुकरच्या विक्री प्रक्रियेला जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यासह विक्रीसाठी ऑनलाइन निविदा मागविल्याचा, सर्वाधिक बोली लावणाऱ्यास कारखाना विक्री केल्याचा आणि सर्व व्यवहार पारदर्शकपणे पार पाडल्याचा दावा संचालक मंडळाकडून वारंवार करण्यात येतो. या कारखान्याच्या विक्रीनंतर ६३ कोटी रूपयांचे कर्ज एक रकमी वसूल झाले. ज्यामुळे १५० ते २०० कोटी रूपयांच्या तोट्यात असलेल्या बँकेची नफ्याकडे वाटचाल सुरू झाल्याचे अध्यक्षांसह संचालक मंडळ सांगत असते. प्रत्यक्षात, मधुकर साखर कारखाना विकताना शेतकरी हीत लक्षात घेतले गेले नाही. ६३ कोटींना कारखाना विकताना त्या ठिकाणच्या गोदामात पडून असलेल्या ३० कोटी रूपयांच्या साखरेचे मूल्य गृहीत धरले गेले नाही, असा आरोप संचालक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये सभासद शेतकऱ्यांमधून नेहमी केला जातो.
आताही जिल्हा सहकारी बँकेने जळगावमधील दगडी बँक म्हणून ओळखली जाणारी स्वमालकीची जुनी इमारत विकण्याकरिता ६५०० चौरस फूट चटई क्षेत्रासाठी सुमारे ४० हजार रुपये प्रति चौरस फूट दर निश्चित केला आहे. त्यानुसार संपूर्ण इमारतीचे एकूण मूल्य १२ कोटी आणि त्यावर अतिरिक्त १५ कोटी रूपये घेण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने अटी-शर्ती टाकून जिल्हा बँकेने यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केल्याचे समजते. त्यास एकमेव विरोधी पक्षाचे संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी विरोध केला आहे. परंपरेचे, वारशाचे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल पुरातन इमारतीच्या विक्रीतून कधीच होऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या दगडी बँकेची ऐतिहासिक वास्तू विकण्यामागे संचालक मंडळाचा नक्की उद्देश काय आहे ?, असा प्रश्न देखील आमदार खडसे यांनी उपस्थित केला आहे.