नाशिक – अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण घेऊन आलेल्या अक्षदा कलशाचे स्वागत आणि पूजनासाठी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात जागा उपलब्ध केल्याने निर्माण झालेल्या वादाने अडचणीत आलेल्या विद्यापीठ प्रशासनाने ऐनवेळी या कार्यक्रमापासून अंतर राखले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी अक्षदा कलश विद्यापीठ मुख्यालयासमोरील प्रांगणात आणला. वंचित बहुजन आघाडी आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी त्यास विरोध दर्शविला. या कार्यक्रमास परवानगी देणाऱ्या कुलगुरूंचा निषेध करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वादामुळे कलश पूजनासाठी कुलगुरूंसह अन्य अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. कार्यक्रमास तुरळक कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. असे असताना कार्यक्रम उत्साहात पार पडल्याचा दावा अभाविपने केला आहे.
नाशिकमध्ये अभाविपने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आदल्या दिवशी उशिरा मुक्त विद्यापीठाने संबंधित कार्यक्रमाची माहिती परिपत्रकाद्वारे कर्मचाऱ्यांना दिली. कलशाचे भव्य स्वागत व पूजनाचा कार्यक्रम मुक्त विद्यापीठ प्रांगणात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्याची अभाविपची विनंती विद्यापीठाने मान्य केली होती. शनिवारी सकाळी सव्वाअकराची वेळ त्यासाठी निश्चित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, अशी सूचना कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी केली होती. कार्यक्रमास कुलगुरू येतील म्हणून काही कर्मचारी येऊन थांबले होते. परंतु, आपल्या उपस्थितीमुळे वाद होण्याची शक्यता लक्षात आल्यावर काही वेळात त्यांनी काढता पाय घेतला. कुलगुरू प्रा. सोनवणे हे कार्यालयात असूनही प्रांगणात आले नाहीत.
हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील अंकाई किल्ल्याजवळील भुयाराचे गूढ, पुरातत्व विभागाकडून पाहणी होणार
दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडीसह अन्य संघटनांचे कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनाबाहेर धडकले. त्यांनी विद्यापीठ आवारात धार्मिक कार्यक्रमास परवानगी देणारे कुलगुरू आणि अभाविपच्या निषेधार्ध घोषणाबाजी केली. कुलगुरूंची भेट घेऊन शैक्षणिक संस्थेच्या आवारात असा धार्मिक कार्यक्रम घेण्यास आक्षेप घेतला. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. उद्या कुणी संदल, नाताळ, उरुस साजरा करण्यास परवानगी मागितली तर, विद्यापीठ देणार का, असा प्रश्न आंदोलकांनी केला.
शैक्षणिक, सरकारी संस्थेत धार्मिक कार्यक्रम अयोग्य आहे. सत्ताधाऱ्यांनी धर्माच्या नावावर देशाचे वातावरण आधीच दूषित केले आहे. आता शैक्षणिक संस्था ज्या शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालतात, तिथे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्यस्तरीय समितीचे सदस्य चेतन गांगुर्डे, महानगरप्रमुख रवी पगारे यांनी दिला. कलश पूजनासह श्रीरामालाही आपला विरोध नाही. अभाविपकडे निधी नसल्यास शहरातील मैदानात कलश पूजनासाठी मंडप उभारण्याची तयारी असल्याचे वंचित आघाडीने नमूद केले.
कार्यक्रम उत्साहात पार पडल्याचा दावा
अभाविपचे महानगरमंत्री ओम मालुंजकर यांनी शुक्रवारी विविध महाविद्यालयांमध्ये यात्रा काढून कलश पूजन करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार अभाविपने मुक्त विद्यापीठ आवारात कुलगुरूंच्या संमतीनुसार या कार्यक्रमाचे आयोजन केले. मंगल अक्षदा कलशाचे विद्यापीठातील सर्व विभागातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पूजन केले, उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पाडल्याचा दावा अभाविपने केला. निश्चित झालेल्या वेळेनुसार कार्यक्रम पार पडला. समाजमाध्यमातून परिपत्रक प्रसारित झाल्यामुळे काहींनी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. काहींनी दालनाबाहेर आंदोलन केल्यामुळे कुलगुरूंनी सुरक्षेच्या दृष्टीने उपस्थित राहण्याबाबत काही वेगळा निर्णय घेतला असण्याची शक्यता मालुंजकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बचाव
धार्मिक कार्यक्रमाच्या वादाने मुक्त विद्यापीठाची कोंडी झाली. परिपत्रक काढल्याने त्यापासून हात झटकणे अवघड झाले. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ही परवानगी दिली गेली होती. असा कार्यक्रम आहे याचे परिपत्रक केवळ माहितीसाठी काढण्यात आले होते. तशी माहिती न देता कार्यक्रम झाला असता तर त्याचे वेगळेच अर्थ निघाले असते. या कार्यक्रमास उपस्थित राहणे कर्मचाऱ्यांना ऐच्छिक होते, बंधनकारक नव्हते, असा बचाव विद्यापीठाकडून केला जात आहे.