जळगाव, धुळे – अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना आपण भेटणार असून त्याची माहिती शरद पवारांनाही आहे. मात्र, शहा यांनी तीन तास बसवून ठेवले आणि आपण वाद मिटवून टाकण्याबाबत फडणवीसांना गळ घातली, या गोष्टी तद्दन खोट्या आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर एकनाथ खडसे आणि त्यांची सूनबाई रक्षा खडसे हे तीन तास बसले होते. परंतु, आम्हांला वेळ दिला नाही. अमित शहा भेटले नाहीत, असे रक्षा खडसे यांना आपण भ्रमणध्वनी केला असता त्यांनी सांगितल्याचा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथे रविवारी रात्री केला होता. नाशिक येथील महानुभाव पंथीयांच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण बरोबर असतांना आमच्याजवळ येऊन जे काही असेल ते बसून मिटवून टाकू, असे खडसे म्हणाले होते, असा गौप्यस्फोटही महाजन यांनी केला होता. याविषयी सोमवारी खडसे यांनी आपली भूमिका मांडली.

हेही वाचा >>> धुळे : खडसेंच्या कानगोष्टींची ध्वनिफित उपलब्ध – गिरीश महाजन यांचा दावा

आपण महाजनांची लहानपणापासूनच काळजी घेतली असून, त्यांनी आता माझी काळजी करण्याची आवश्यकता नाही. श्रद्धा आणि सबुरीची गरज मला नव्हे; तर त्यांना आहे, असे खडसे यांनी सांगितले. नाशिक येथे महानुभाव पंथीयांच्या अधिवेशनात माझे भाषण झाल्यानंतर फडणवीसांची भेट मागितली. मिटवून टाका, असे काही मी बोललोच नाही. मला भेटायचं आहे, असे फडणवीसांना सांगितले. एवढाच विषय झाला आहे. फडणवीसांनी पुढच्या आठवड्यात मी कळवतो, असे सांगितले. त्यानंतर फडणवीसांशी बोलणे झाले. ते विदेशात गेले होते, आता काय मिटवायचे राहिले ? सर्व प्रकार तर सुरूच आहेत. ईडी सुरू आहे, सीबीआय सुरू आहे. लाचलुचपतची कारवाई सुरू आहे. सर्वच ठिकाणी त्रास देणे सुरू आहे. याविरुध्द मी लढणार आहे, असेही खडसे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नागपूर : ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच समपुदेशकाची नियुक्ती’

आम्ही अमित शहांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यांची भेट झाली नाही, एवढेच बोलले असल्याचे रक्षाताईंकडून सांगण्यात आल्याचे खडसे यांनी नमूद केले. शहांच्या भेटीविषयी शरद पवारांना कल्पना दिलेली होती. आपण दोघे जाऊ आणि अमित शहांची भेट घेऊ, असे पवारांनी मला सांगितले आहे. यासंदर्भात काही गैरसमज झाले आहेत. प्रत्यक्ष नव्हे तर दूरध्वनीवरून शहांशी चर्चा झालेली आहे. शरद पवार यांच्यासह शहा आणि फडणवीस यांची भेट घेणार आहे. मी पन्नास कोटी घेऊन जाणारा माणूस नाही. नाथाभाऊ हा खोक्यांवर विकला जाणारा माणूस नाही, असा टोलाही खडसेंनी लगावला. ज्या पक्षाने आमदारकी दिली, राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, तो सोडणार नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.