नाशिक : पंचवटीतील राहुलवाडी भागात सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर दोन गुंडांनी गोळीबार केल्याचा कट नाशिकरोड येथील एका लॉजमध्ये शिजला होता. अमरावती कारागृहात असणाऱ्या निकम टोळीचा म्होरक्या शेखर निकमला कैदी पार्टीने नाशिक न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. निकमला कोठडीत न ठेवला पोलीस पथकाने लॉजमध्ये मुक्काम केला. या ठिकाणी पंचवटीतील गोळीबाराचा कट शिजल्याचे तपासात उघड झाले. कैद्याला घेऊन लॉजमध्ये थांबल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती पोलीस आयुक्तांनी कैदी पार्टीतील तीन पोलिसांना निलंबित केले. आता नाशिक पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत.

फुलेनगरमधील वर्चस्व वादातून उघडे आणि निकम टोळीत संघर्ष सुरू आहे. उघडे टोळीने २०१७ मध्ये निकम टोळीचा म्होरक्या शेखऱ् निकमचा भाऊ किरण निकमची हत्या केली. या गुन्ह्यातील संशयित सागर जाधव याची सुटका झाली. निकम टोळी त्याच्या मागावर होती. यातून राहुलवाडी भागात निकम टोळीतील संशयितांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात तो बचावला. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून गोळीबाराच्या कटात भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील याचे नाव उघड झाले. पोलिसांनी त्यास अटक केली.

या हल्ल्याचा कट नाशिकरोड येथील एका लॉजमध्ये शिजला होता. संशयितांची तिथे बैठक झाली. यावेळी माजी नगरसेवक पाटीलही तिथे होते. लॉजमधील सीसीटीव्ही चित्रणातून हे उघड झाले. निकम टोळीचा म्होरक्या शेखर निकम अमरावती कारागृहात आहे. त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालयातील तीन कर्मचारी आदल्या दिवशी नाशिकमध्ये घेऊन आले होते. कैदी निकमला कोठडीत ठेवणे आवश्यक होते. परंतु, कैदी घेऊन आलेल्या पोलीस पथकाने निकमसह नाशिकरोड येथील लॉजमध्ये मुक्काम केला.

या लाॅजमध्ये संशयितांनी निकमची भेट घेतली होती. ही बाब प्राथमिक तपासात उघड झाल्यानंतर अमरावती पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत या पथकातील उपनिरीक्षक मनोहर राठोड, अमलदार मुकेश यादव आणि सिद्धेश्वर गुट्टे या तिघांना निलंबित करुन त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. गोळीबार प्रकरणी पंचवटी पोलिसांनी जवळपास १३ जणांना अटक केली. यात भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचाही समावेश आहे. नाशिकरोड येथील लॉजमध्ये संशयित आणि कैदी निकम यांची भेट झाली होती. या अनुषंगाने स्थानिक पोलीस अमरावतीतील निलंबित पोलिसांचा जबाब घेतील, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच अमरावती कारागृहात असणाऱ्या शेखर निकमचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.